Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जागेचे दर गगनाला भिडू लागले आहेत. चांगल्या परिसरात घर खरेदी करणे किंवा भाड्याने घेणे अनेकांसाठी आवाक्याबाहेरचे होऊ लागले आहे. अशा नागरिकांचे मुंबईजवळ हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडाचा कोकण विभाग सरसावला आहे. लवकरच म्हाडा कोकण विभाग घरांची सोडत काढणार आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाचा कोकण विभाग म्हणजेच म्हाडा कोकण जुलै 2025 मध्ये चार हजार घरांची सोडत काढण्याची तयारी करत आहे. या सोडतीतील अर्थात लॉटरीतील किमान एक हजार घरं ही ठाण्यातील चितळसर भागात आहेत. कल्याणमध्येही शेकडो घरांचा पर्याय या सोडतीमुळे उपलब्ध होणार आहे.

याआधी 2024 मध्ये म्हाडा मुंबईची सोडत निघाली होती. आता म्हाडा कोकणची सोडत निघणार आहे. जुलै महिन्यात कोकण विभाग कल्याण आणि ठाणे शहरांसाठी सोडत जाहीर करेल. म्हाडाच्या कोकण मंडळाने गेल्या दीड वर्षात तीन सोडती काढल्या. याद्वारे सुमारे दहा हजार लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता जुलै 2025 मध्ये म्हाडा कोकण काढणार असलेल्या सोडतीमुळे हजारो नागरिकांचे मुंबई जवळ हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

म्हाडाने महाराष्ट्रात 2025 – 26 या आर्थिक वर्षात 19 हजार 497 घरे बांधण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यात मुंबईतील पाच हजार 199 घरांचा समावेश आहे. यामुळे घर खरेदी करण्याच्या प्रतीक्षेत लोकांना दिलासा मिळण्यास मदत होईल. म्हाडा कोकणात नऊ हजार 902, पुण्यात 1836, नागपूरमध्ये 692, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1608, नाशिकमध्ये 91, अमरावतीत 169 घरे बांधण्याचे उद्दीष्ट डोळ्यांपुढे ठेवून काम करत आहे. म्हाडाने मुंबईतील घरांसाठी 5749.49 कोटी, कोकणातील घरांसाठी 1408.85 कोटी, पुण्यातील घरांसाठी 585, नागपूरच्या घरांसाठी 1009 कोटी, छत्रपती संभाजीनगरमधील घरांसाठी 65.96 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.