Spread the love

अनिल देशमुख म्हणाले, जवळ या तुमच्या कानात सांगतो…

मुंबई : महान कार्य वृत्तसेवा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै 2023 मध्ये खासदार शरद पवार यांच्याशी फारकत घेत भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ”मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष” नेमका कुणाचा? या मुद्द्यावरून दोन्ही नेते न्यायालयातही गेले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात लढवल्या. मात्र त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनौपचारिक गाठीभेटी होऊ लागल्या. काही सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्र व्यासपीठावर दिसल्याचेही अनेक वेळा पाहायला मिळाले. यानंतर शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट पुन्हा एकत्र येण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर राजकीय चर्चांना नवीन दिशा मिळाली. ”दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. मात्र अंतिम निर्णय सुप्रिया सुळे यांचाच असेल,” असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

”राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील, ही चर्चा सध्या फक्त मिडियामध्येच सुरू आहे. प्रत्यक्षात राजकीय पातळीवर अशा कोणत्याही चर्चेला सुरुवात झालेली नाही, असे अनिल देशमुख म्हणाले. तर अजित पवार यांनी त्यांच्या गटातील नेत्यांना सांगितले की, शरद पवार गटाकडूनच ही माहिती पेरली जात आहे, कारण त्यांच्या पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे, याबाबत विचारले असता ”म्हणूनच मी म्हणतोय ना, ही चर्चा कुठेच नाहीये, फक्त मिडियात आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

जवळ या तुमच्या कानात सांगतो…

यानंतर ‘तुमच्या मनात काय आहे?’ असे विचारले असता अनिल देशमुख म्हणाले की, आमच्या पक्षात अशा कोणत्याही चर्चेला वाव नाही. आम्ही वेळ आल्यावर वरिष्ठांशी याबाबत बोलू, असे त्यांनी म्हटले. मात्र पत्रकारांनी ‘तुमच्या मनात नेमकं काय आहे?’ असा प्रश्न पुन्हा विचारताच अनिल देशमुख मिश्कीलपणे म्हणाले की, ”जवळ या तुमच्या कानात सांगतो…”  त्यांच्या या उत्तराची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

दोन्ही गट एकत्र येण्यासंदर्भात सध्या कुठलीही चर्चा नाही

देशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांनी तर राज्यात अजित पवारांनी नेतृत्व करावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेतच, त्या खासदार देखील आहेत. त्या वरिष्ठ नेत्या आहेत. त्यामुळे काही प्रश्नच नाही. दरम्यान, दोन्ही गट एकत्र येण्यासंदर्भात सध्या कुठलीही चर्चा नाही, असे अनिल देशमुख यांनी म्हटले.

पवार कुटुंब एकत्र येणार असेल तर कार्यकर्त्यांना आनंदच :  प्रवीण कुंटे पाटील

दरम्यान, राजकारण हा नेहमीच शक्यतेचा खेळ आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि पवार कुटुंब एकत्रित येणार असेल, तर सामान्य कार्यकर्त्यांना त्याचा आनंदच होईल, अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी दिली आहे. सध्या तरी पक्षात कुठल्याही व्यासपीठावर दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरू नाही, असा दावाही प्रवीण कुंटे पाटील यांनी केला. सामान्य कार्यकर्त्यांना नक्कीच वाटतंय की दोन्ही गट आणि कुटुंब एकत्रित आलं पाहिजे, असेही पाटील म्हणाले. दरम्यान, या संदर्भात अजित पवार यांच्या पक्षात काय सुरू आहे? याची आम्हाला मात्र कुठलीही माहिती नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.