श्रीनगर / महान कार्य वृत्तसेवा
दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील शकरू केलर भागात मंगळवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. सुरक्षा दलाला शोपियानमधील भागात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि भारतीय सैन्यदलानं दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संयुक्तपणं शोधमोहिम सुरू केली.
सुरक्षा दलाची संयुक्त शोधमोहिम सुरू असताना परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. या भागात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे. संपूर्ण परिसराला सुरक्षा दलाने वेढा घालून दहशतवादाविरुद्धची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
7 मे रोजी दहशतवाद्याविरोधात मोठी कारवाई- भारतीय सैन्यदलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 7 मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) 9 दहशतवादी छावण्यावर अचूक हल्ला करून सुमारे 100 दहशतवादी ठार केले. या कारवाईत लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि जैश-ए-मोहम्मदचे (जेईएम) हाय-प्रोफाइल दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. यामध्ये आयसी-814 विमान अपहरण करणाऱ्या मौलाना युसूफ अझहरचाही समावेश होता. त्याचबरोबर मुदस्सर खादियान खास, हाफिज मुहम्मद जमील, मोहम्मद युसूफ अझहर, खालिद (अबू आकाशा) आणि मोहम्मद हसन खान या दहशतवाद्यांना ठार केलं. मारले गेलेले दहशतवादी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनामधील सर्वात उच्चपदस्थ व्यक्तींपैकी एक होते. त्यांचे लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दोन्ही संघटनांशी संबंधित होते.
संशयित दहशतवाद्यांची लावण्यात आली पोस्टर्स- पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यात अद्याप यश आलेलं नाही. सुरक्षा दलानं दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील विविध भागात आज सकाळी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन वॉन्टेड दहशतवाद्यांची पोस्टर्स अनेक ठिकाणी चिकटवण्यात आले.
सुरक्षा दलानं काय केलं आवाहन? दहशतवाद्यांबद्दल काही माहिती असेल तर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे. माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. तसेच त्याची ओळख गुप्त ठेवली जाईल, असे सुरक्षा दलानं आवाहन केलं आहे. निष्पाप लोकांची हत्या करणाऱ्यांना देशात कोणतेही स्थान नाही. देशाला त्यांची गरजही नाही. या दहशतवाद्यांची तक्रार करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये सामंजस्य शस्त्रसंधी- पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात सुमारे 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील जनतेमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. दहशतवाद्यांचा निषेध करत मोठ्या संख्येनं स्थानिक लोक रस्त्यावर उतरले. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले. सध्या, दोन्ही देशांमध्ये सामंजस्य शस्त्रसंधी आहे.
