रक्तदाब वाढल्याने रुग्णालयात दाखल
कारवाईचे फटाके वाजवून स्वागत
इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (सुभाष भस्मे)
इचलकरंजी येथील महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 30 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले. मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास स्टेशन रोडवरील महावितरणच्या कार्यालयातच ही कारवाई झाल्याचे समजल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या विभागातील भ्रष्ट कारभाराने त्रस्त झालेल्या काही मंडळींनी महावितरणच्या प्रवेशद्वारातच फटाक्यांची आतषबाजी करत कारवाईचे स्वागत केले.
प्रशांत राठी हे महावितरणचे हे वरिष्ठ अधिकारी असून त्यांच्यावरच कारवाई झाल्याने महावितरणमधील भ्रष्टाचाराच्या चर्चेला तोंड फुटले आहे. कोल्हापूर विभागातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून घटनेची नोंद करण्याचे काम शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुरु होते.
दरम्यान, कारवाई झाल्याचे समजल्यानंतर अनेकांनी महावितरण कार्यालयाकडे धाव घेतली. तर कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या राठी यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ही कारवाई नेमकी कोणत्या प्रकरणात झाली, प्रत्यक्षात मागणी व स्विकारलेली रक्कम याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते.
