सी-60 जवानांच्या मोहिमेला यश, मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोली / महान कार्य वृत्तसेवा
देशात एकीकडे सीमारेषेवर तणाव असून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवरुन लष्कर अलर्ट मोडवर आहे. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पहलगाम हल्ल्याचा बदला घेत दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. भारतीय वायुसेनेच्या या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचा दावा भारतीय सैन्याने केला आहे. एकीकडे भारतीय सैन्य दलाकडून दहशतवाद्यांच्या तळांना समूळ नष्ट करण्यात येत असताना दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी कारवायांवरही सुरक्षा दलाकडून मोहिम राबवली जात आहे. भामराकडजवळ नक्षलवादी कारवायांसाठी उभारण्यात आलेला तळ गडचिरोली पोलिसांनी उध्वस्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळील कवंडे परिसरात नक्षलवाद्यांच्या भामरागड दलाने घातपात घडवण्यासाठी तळ उभारला होता. मात्र, हा तळ उध्वस्त करण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश आले. गोपनीय माहितीच्याआधारे अपर पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-60 चे सुमारे 200 जवान विशेष अभियानावर होते. दरम्यान, आज सकाळी जंगल परिसरात शोध घेत असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी, सी-60 जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. ही चकमक तीन वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास दोन तास चालू होती. चकमकीनंतर परिसरात करण्यात आलेल्या शोधमोहिमेत एक स्वयंचलित इन्सास रायफल,एक सिंगल शॉट रायफल,एक मॅगझीन,अनेक जिवंत काडतुसे,डिटोनेटर,एक रेडिओ, तीन पिट्टु (सामानाची पिशवी), वॉकीटॉकी चार्जरसह मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य आणि वैयक्तिक वस्तू सापडल्या आहेत. गडचिरोलीतील सी-60 जवानांनी नक्षलवाद्यांचा तळ पूर्णत: उद्ध्वस्त केला असून चकमकीत काही नक्षलवादी जखमी अथवा ठार झाल्याची शक्यता असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.