नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी हल्ला करून दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. या कारवाईत नेमके किती दहशतवादी आणि पाकिस्तानी सैनिक ठार झाले याची चर्चा सुरू झाली. पण त्यावर भारतीय सैन्याने मात्र स्पष्ट शब्दात माहिती दिली. आमचे काम हे दहशतवाद्यांना टार्गेट करणे आहे, त्यांच्या प्रेतांची संख्या मोजणे नाही असं एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी लष्कराच्या तीनही दलांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये पाकिस्तानच्या नऊ ठिकाणी हल्ले करुन दहशतवादी तळं उद्ध्वस्त केल्याची माहिती देण्यात आली. तसेच भारताच्या या हल्ल्यात 100 हून जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती देण्यात आली.
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक ठार
आधी पाकिस्ताने भारताच्या वेगवेगळ्या शहरांवर हल्ले केले. त्यावेळी पाकिस्तानचे सर्व ड्रोन्स निकामी करण्यात आले. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकस्तानचे 35 ते 40 सैनिक ठार झाले. त्यामध्ये काही मोठ्या अधिकाऱ्यांचासाही समावेश असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली.
प्रेतांची संख्या मोजणे आमचं काम नाही
भारताने केलेल्या कारवाईमध्ये नेमके किती दहशतवादी आणि पाकिस्तानी सैनिक ठार झाले असा प्रश्न विचारण्यात आला. नेमका आकडा लष्कराकडे आहे का याची माहिती विचारण्यात आली. त्यावर एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, ”आमचे काम हे मिसाईल टाकून लक्ष्य भेदणे आहे, प्रेतांची संख्या मोजणे नाही. आम्ही आमचे काम हे चोखपणे बजावले. आम्ही अशाच ठिकाणी हल्ला केला ज्यामुळे पाकिस्तानचे जास्तीत जास्त नुकसान होईल.”
पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान
एअर मार्शल ए.के. भारती पुढे म्हणाले की, ”भारताने समन्वय साधत पाकिस्तानच्या हवाई दलाच्या तळावर, कमांड सेंटरवर अत्यंत जलदगतीने हल्ला केला. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाले. भारतीय हल्ल्यांमध्ये चकलाला, रफिक आणि रहीम यार खान सारख्या महत्त्वाच्या हवाई तळांचा समावेश होता. यानंतर, सरगोधा, भुलारी आणि जेकबाबाद सारख्या इतर महत्त्वाच्या लष्करी तळांवरही हल्ला करण्यात आला.”
आमचा लढा दहशतवाद्यांशी
आमचा लढा अतिरेक्यांशी होता. आम्हाला पाकिस्तानी वायुदलावर हल्ला करायचा नव्हता, पण पाक लष्कर अतिरेक्यांच्या मदतीसाठी उतरला असं भारतीय वायुदलाचे एअर मार्शल ए.के.भारती म्हणाले. भारताच्या एकाही वायुदलाला हानी पोहोचलेली नाही, आपले सर्व वायुदल तल आणि तिथली यंत्रणा कार्यान्नवित आहेत असं देखील एअर मार्शल भारती म्हणाले. एअर मार्शल ए.के. भारती यांच्या या वक्तव्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे कंबरडे या हल्ल्यामुळे मोडल्याची माहिती समोर येत आहे.
