दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला. यामध्ये 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरला सुरुवात केली. भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ तळं उद्धवस्त केले. त्यानंतर भारत पाक युद्धाला सुरुवात झाली आणि हे युद्ध तीन दिवस चाललं. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत -पाक दरम्यान, शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारत-पाकने देखील हे मान्य केले होते. मात्र, शस्त्रसंधीनंतरही पाकिस्तानने शनिवारी (दि.11) रात्री भारतावर गोळीबार आणि हल्ले केले.यानंतर आज (दि.11) विरोधी पक्षांनी भूमिका मांडली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.
राहुल गांधी या पत्रात म्हणाले, संसदेचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलावण्याच्या विरोधी पक्षांच्या एकमताने केलेल्या विनंतीचा मी पुनरुच्चार करतो. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पहिल्यांदा जाहीर केलेल्या आजच्या युद्धबंदीवर चर्चा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपला सामूहिक निर्धार दाखविण्याची ही एक संधी असेल. मला विश्वास आहे की तुम्ही या मागणीचा गांभीर्याने आणि जलद गतीने विचार कराल.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, मी 28 एप्रिल 2025 रोजीच्या आमच्या पत्रांद्वारे पहलगाममधील अमानुष दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली होती. ताज्या घडामोडी लक्षात घेता, लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांनी पहलगाम दहशतवाद, ऑपरेशन सिंदूर आणि प्रथम वॉशिंग्टन डीसी आणि नंतर भारत आणि पाकिस्तान सरकारांनी केलेल्या युद्धबंदीच्या घोषणांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची सर्व विरोधी पक्षांची एकमताने विनंती तुम्हाला पुन्हा एकदा पत्राद्वारे कळवली आहे.
