पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा
पुलाची शिरोली येथील सांगली फाट्यावर कोल्हापूर सांगली राज्य मार्गावर जगदंब टाईल्स समोर टँकरने मालवाहतूक टेम्पोस धडक दिल्याने टेम्पो चालक अरूण शिवाजी पाटील (रा.बिऊर, ता. बत्तीस शिराळा जि.सांगली) ठार झाला. हा अपघात बुधवारी दुपारी ४.३० वाजता सांगली फाटा मार्बल लाईन येथे जगदंबा टाईल्स समोर घडला .
सविस्तर माहिती अशी की, सांगली फाटा येथील जंगदब टाईल्स येथे अरूण शिवाजी पाटील (रा. बिऊर, ता. बत्तीस शिराळा जि.सांगली) हे मार्बल टाईल्स खरेदी करण्यासाठी दुपारी आले होते. टाईल्स खरेदी करून आपल्या मालवाहतूक टेम्पोने रस्ता ओलांडून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना सांगलीकडे जाणाऱ्या टँकरने जोराची धडक दिल्याने टाईल्स भरलेला टेम्पो पलटी होऊन टेम्पोच्या खाली अरूण पाटील हे अडकल्याने ते गंभीर जखमी झाले.
उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघाताची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली आहे.
