इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी शहरासह आसपासच्या परिसरात मटका व्यवसायाने अक्षरशः उच्छाद मांडला असून “ओपन जेऊ देइना तर क्लोज झोपू देईन” अशी परिस्थिती असून, डीवायएसपी समिरसिंह साळवे यांच्या नाकावर टिचून हे अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे या अवैध धंद्याचा “आका” कोण ? असे म्हणायची वेळ आता सर्वसामान्य नागरिकांच्या वर आली आहे.
इचलकरंजी नगरी ही वस्त्रनगरी म्हणून सर्वत्र परिचित आहे. इचलकरंजीमध्ये माणूस उपाशी झोपत नाही असे म्हटले जाते,कारण प्रत्येक हाताला काम देण्याची क्षमता या शहरात असल्याने रोजच्या रोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल या शहरामध्ये होते. याचाच फायदा घेत मटका व्यावसायिकानी इचलकरंजी शहरासह आसपासच्या गावांमध्ये आपले चांगलेच बस्तान बसवले आहे. या मटक्याला एंट्रीचं अभय असल्याने “मटका जोमात तर पोलिस यंत्रणा कोमात” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांच्या काळात मटका व्यवसायिकांना सळो की पळो करून सोडले होते. कोल्हापुरातील अनेक मटका व्यवसायिकांना मोक्यासारखी कारवाई करून जेरीस आणले होते. मात्र डीवायएसपी समिरसिंह साळवे हे रुजू झाल्यानंतर ,”गाव तिथे गावठी दारू-तर गल्ली तिथे मटका अशाप्रकारे अवैध धंद्याचे सत्र सुरू झाले आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक मटक्याचे जाळे पसरलेले असून या मटक्याचे नियोजन, खाकितील एस.बी,एस.के, जी.बी हे हाताळत असून महिन्याकाठी लाखो रुपयांचा हप्ता गोळा केल्याने मटका व्यवसायिकांचे चांगलेच बस्तान बसले आहे. तर महिन्याकाठी मोठ्या प्रमाणात हप्ता मिळाल्याने पोलिसांनाही चांगल्या प्रमाणात वर कमाई होत आहे.
इचलकरंजी शहरात एक अप्पर पोलीस अधीक्षक व एक डीवायएसपी असताना त्यांच्या नाकावर टिचून हे अवैध धंदे सुरू आहेत. मात्र त्यांचा याकडे का कानाडोळा आहे हे जनतेला कळून चुकले असून आता वस्त्र नगरीला मटक्याच्या महाजलातून वाचवण्यासाठी नवीन प्रामाणिक अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे गरजेचे आहे.
डीबी पथक बरखास्त?
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे डीबी पथक जिल्हा पोलीस प्रमुखांनी बरखास्त केले. मात्र या डीबी पथकातील कर्मचारी अद्यापही जनरल ड्युटी करत नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ते अद्यापही सिव्हिल ड्रेसवरच फिरतात हे विशेष. जनरल ड्युटी टाकणाऱ्या एका हजेरी मास्तरला कोल्हापूरला मुख्यालयात पाठवण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी डीबी पथक बरखास्त केले असले तरी, शिवाजीनगर पोलीस जिल्हा पोलीस प्रमुखांचा आदेश धाब्यावर बसवून मनमानी कारभार करत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांचे हजेरी रजिस्टर चेक करण्याची तसदी जिल्हा प्रमुख घेणार का? हे पाहणे गरजेचे आहे.
