दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
भारतीय सैन्याने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ हवेतून क्षेपणास्त्रं डागून बेचिराख केले होते. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानी सैन्याला मोठा झटका बसला होता. भारताच्या या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान खडबडून जागा झाला होता. पाकिस्तानी सैन्याने सीमेवर सैन्याची आणि युद्धसामुग्रीची जमवाजमव सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वायू दलाला केंद्र सरकारने खुली सूट दिली आहे. पाकिस्तानने आगळीक केल्यास तोडीस तोड उत्तर देण्याची मुभा एअरफोर्सला देण्यात आली आहे. पाकिस्तानची लढाऊ विमाने भारतीय हद्दीत शिरली तर त्यांना योग्य ते प्रत्युत्तर देण्याचे सर्वाधिकार वायदूलाला देण्यात आले आहेत.
ऑपरेशन सिंदूर नंतर दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीत आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली सर्वपक्षीय बैठक होत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. सर्वपक्षीय बैठकीनंतर भारत पाकिस्तानविरुद्ध आणखी एखादी निर्णायक कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानकडून हवाई हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील 27 विमानतळं बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये श्रीनगर, जम्मू, चंदीगढ, अमृतसर आणि लुधियाना येथील विमानतळांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सीमारेषेवरील फिरोजपूर जिल्ह्यातील अनेक गावे भारतीय सैन्याकडून खाली केली जात आहेत. पाकिस्तानी सैन्याने सीमारेषेवरील भारतीय गावांवर केलेल्या हल्ल्यात 13 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर महाराष्ट्रात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील महत्त्वाच्या संस्था, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
