देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक की उपरोधिक टोला?
सातारा / महान कार्य वृत्तसेवा
आगामी काळामध्ये एक-दोन कॅबिनेट दरे गावातच घेऊ. म्हणजे आम्हालाही इथं येण्याची संधी मिळेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटन महोत्सवाच्या समारोपात बोलताना केलं. या वक्त्यातून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं की उपरोधिक टोला लगावला, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत महाबळेश्वरमधील तीन दिवसीय महापर्यटन महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ”एकनाथ शिंदे इथले भूमिपुत्र असल्यानं त्यांना महाबळेश्वरला येण्याची संधी मिळते. कारण, हा भागच असा आहे की इथं वारंवार यावं, असं प्रत्येकाला वाटते. पण, आम्हाला तशी संधी कमी मिळते. त्यामुळं पुढच्या एक-दोन कॅबिनेट दरे गावातच घेऊ. म्हणजे आम्हालाही इकडे यायला मिळेल.”
एकनाथ शिंदे गावी आले बातम्या होतात : ”एकनाथ शिंदे दरे गावी आले की मुंबईत वेगळ्याच बातम्या होतात. परंतु, गावी येऊन ते नवसंजीवनी घेऊन मुंबईला जातात आणि पुन्हा जनसेवेत रुजू होतात. तशीच नवसंजीवनी घेण्यासाठी शिंदे साहेब आम्हालाही वारंवार बोलवा,” अशी कोपरखळीही देवेंद्र फडणवीस यांनी मारली. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचे आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
मी गावी आल्यावर मुंबईचं टेम्परेचर वाढते : एकनाथ शिंदे यांनी देखील या कार्यक्रमात जोरदार टोलेबाजी केली. मुख्यमंर्त्यांना उद्देशून ते म्हणाले की, ”मी जेव्हा इकडं दरे गावी येतो तेव्हा इकडचं टेम्परेचर खाली येते आणि मुंबईचं टेम्परेचर वाढते. मग विरोधक आणि वृत्तवाहिन्या हेडलाईन करतात. मी सुद्धा त्याचा आनंद घेतो. परंतु, मी इकडे का येतो, त्याचं कारण आज तुम्हालाही पटलं असेल.”
गावी आलं की झाडं लावतो, त्यात बांबू पण आहे : ”मी गावी आलो की दोन-तीन हजार झाडं लावतो. यात काजू, आंब्यापासून चिकू, नारळ, सुपारी, सफरचंदाची झाडं लावली आहेत. त्यात बांबू पण आहे. तो कुठं लावायचा हे आमच्या मुख्यमंर्त्यांना माहीत आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला. ”बांबू हा ऑक्सिजन देणारा आणि कार्बनडाय ऑक्साईड शोषणारा आहे. त्यामुळे वेगळा अर्थ काढू नका,” अशी त्यांनी पुष्टी जोडताच पुन्हा हशा पिकला.
