पोलीस विभागाचीच माहिती
नागपूर / महान कार्य वृत्तसेवा
राज्याला सायबर गुन्हेगारांनी विळखा घातला असून सायबर गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात पोलीस विभागाला अपयश आले आहे. राज्यात दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत आरोपी अटकेचे प्रमाण अत्यल्प आहे. गेल्या वर्षभरात मुंबईत सर्वाधिक 757 सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे तर दुसऱ्या स्थानावर ठाणे (13) शहराचा क्रमांक लागतो. राज्यात जवळपास 9 हजार सायबर गुन्हे दाखल असून त्यापैकी केवळ 1 हजार 7 सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे, ही माहिती पोलीस विभागाच्या संकेतस्थळावरून प्राप्त झाली आहे.
सायबर गुन्हेगारांनी अनेकांच्या खात्यातून पैसे परस्पर लंपास करणे सुरू केले आहे. सायबर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी सायबर पोलीस तसेच अद्ययावत तपास तंत्रे अस्तित्वात आली आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी), डाटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडिया (डीएससीआय), सायबर फॉरेन्सिक प्रयोगशाळा आदींची यासाठी स्थापना करण्यात आली. मुंबई आणि पुण्यातही या मोठमोठ्या प्रयोगशाळा अस्तित्वात आहेत. तसेच आता प्रत्येक शहरात स्वतंर्त्य सायबर पोलीस ठाणे आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात यंत्रणा तयार करूनही देशातील सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत.
राज्यात मुंबईत सर्वाधिक सायबर गुन्हे दाखल आहेत. मुंबईत 4849 सायबर गुन्हे दाखल असून 757 सायबर गुन्हेगारांना मुंबई पोलिसांनी अटक केली. मात्र, राज्यातील अन्य पोलीस आयुक्तालयाकडून सायबर गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई होताना दिसत नाही. ठाणे शहरात 680 गुन्हे दाखल करण्यात आले असून फक्त 13 गुन्हेगारांना अटक करण्यात आली. पुणे शहरात 1504 सायबर गुन्हे दाखल असून 9 सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली. सर्वात शेवटच्या स्थानी नागपूर शहराचा क्रमांक लागतो. नागपुरात 212 सायबर गुन्हे दाखल असून फक्त 5 सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. या आकडेवारीवरून महाराष्ट्र पोलिसांचे अपयश स्पष्टपणे दिसते.
फसवणुकीचा आकडा हजारो कोटींमध्ये
डिजीटल अरेस्ट, ओटीपी-पासवर्ड विचारून फसवणूक, सेक्स्टॉर्शन, शेअर ट्रेडिंग आणि लिंक पाठवून सायबर गुन्हेगार राज्यात लूट करीत आहेत. राज्यात 2024 मध्ये सायबर गुन्हेगारांनी 7 हजार 634 लाख कोटी रुपयांनी फसवणूक केली. सायबर गुन्हेगारांनी पुण्यात सहा हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तर मुंबईत 888 कोटी 29 लाखांनी फसवणूक झाली. ठाणे शहरात 174 कोटी 4 लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. गृहमंर्त्याच्या नागपूर शहरात 63 कोटी 85 लाखांनी फसवणूक करण्यात आली.
सायबर गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी सायबर पोलीस सज्ज आहेत. सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाल्यास गांभीर्याने दखल घेण्यात येते. अनेक गुन्ह्यात सायबर गुन्हेगारांनी उकळलेली रक्कम पोलिसांच्या प्रयत्नाने परत मिळवण्यात यश आले आहे
