भारतीय लष्कराची गोपनीय माहिती
नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी वाढत्या वैमनस्याच्या पार्श्वभूमीवर अमृतसरमध्ये दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना पकडण्यात आले आहे. अमृतसर ग्रामीण पोलिसांनी पलक शेर मसीह आणि सूरज मसीह नावाच्या दोघांना अटक केली आहे, ज्यांच्यावर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे गुप्तहेर असल्याचा आरोप आहे.
आरोपी पाकिस्तानी गुप्तहेर हे अमृतसरमध्ये राहून भारतीय लष्कर आणि अमृतसर एअरबेसशी संबंधित माहिती पाकिस्तानला देत होते. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांनी अमृतसर तुरुंगात बंद असलेल्या हरप्रीत सिंग उर्फ हॅप्पी मार्फत या लोकांशी संपर्क साधल्याची माहिती मिळत आहे.
सैन्याच्या हालचालींवर ठेवून होते लक्ष
आरोपी सूरज मसीह आणि पलक शेर मसीह हे अमृतसरच्या बलहडवाल येथील रहिवासी आहेत. पोलीस तपासात हे दोन्ही गुप्तहेर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आयएसआय एजंट फोनद्वारे सैन्याच्या हालचाली, अमृतसर एअरबेसचे फोटो आणि व्हिडिओ आयएसआयला पाठवत होते. यासाठी त्यांना सिम कार्ड आणि फोन देण्यात आला होता.
अमृतसर पोलिसांकडून सखोल तपास
या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात असल्याचे अमृतसर पोलिसांचे म्हणणे आहे. दोन्ही आरोपींनी आतापर्यंत पाकिस्तानला कोणती माहिती दिली आहे आणि त्यामागे त्यांचा हेतू काय होता? याचा तपास केला जात आहे. या कृत्यात त्यांच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा देखील तपास पोलिसांकडून केला जात आहे. या आयएसआय एजंट्सकडून आर्मी कॅन्टोन्मेंट आणि एअरबेसबद्दल माहिती असलेली कागदपत्रे पोलिसांना सापडली आहेत. तसेच काही छायाचित्रे देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत. या आरोपींचा पाकिस्तान गुप्तचर संस्थेशी काय संबंध आहे? याची चौकशी केली जात आहे.
दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानशी राजनैतिक संबंध कमी करून अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. देशभरातून व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आले आहे. तर आयात-निर्यातीवरही बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या 26 लोकांचा बदला पाकिस्तानकडून लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी देशभरातून होत आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकार घाबरलेल्या स्थितीत आहे आणि त्यांचे सैन्य सीमेवर सतत युद्धबंदीचे उल्लंघन करत आहे. युद्धबंदीचे उल्लंघन करून दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय लष्कर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याला सतत चोख प्रत्युत्तर देत आहे.
