पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने स्पष्ट केली भूमिका
नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान अमेरिकेने भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. अमेरिका दहशतवादाविरोधात भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे स्टेट डिपार्टमेंटने स्पष्ट केले आहे. याबरोबरच सेक्रटरी ऑफ स्टेट मार्को रूबिओ यांनी भारत आणि पाकिस्तान यांना दक्षिण आशियामध्ये दीर्घकाळ शांतता आणि प्रादेशिक स्थैर्य यासाठी जबाबदारीने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्या टॅमी ब्रुस वॉशिंग्टन येथे गुरूवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
तसेच सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो यांनी बुधवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. ”जसे की राष्ट्राध्यक्ष (डोनाल्ड ट्रम्प) यांनी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या आठवड्यात सांगितले, दहशतवादाविरोधात अमेरिका भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आणि पंतप्रधान मोदी यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे,” असे ब्रुस म्हणाल्या.
रुबिओ यांनी ”दोन्ही देशांना प्रोत्साहित केलेष्ठ.जबाबदारीने तोडगा काढावा ज्या माध्यमातून दक्षिण आशियामध्ये दीर्घकालीन शांतता आणि प्रादेशिक स्थैर्य कायम राहिल,” असेही ब्रुस यांनी सांगितले. ”हे सरकार सातत्याने संपर्कात आहे. दोन्ही देशांकडे आम्ही जबाबदारीने तोडगा काढण्याची मागणी करत आहोत. यापेक्षा जास्त मी तुम्हाला कोणतीही माहिती देऊ शकत नाही,” असेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान यांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच इस्लामाबादला पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत सहकार्य करण्याची विनंती देखील केली आहे. तसेच जयशंकर यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान रुबियो यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात झालेल्या 26 नागरिकांचा मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले.
