पहलगाम हल्ल्यानंतर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे. या भ्याड हल्ल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अण्णा हजारे म्हणाले की, काही देशविरोधी शक्तींना भारतातील शांतता, एकोप्याचे वातावरण खपवत नाही, म्हणूनच ते अशा खोडसाळ आणि क्रूर कृत्यांना प्रवृत्त होतात. अशा घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. मात्र, आपण घाबरून जायचं नाही. देशाने एकत्र येऊन अशा हल्ल्यांचा विरोध करायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे.
1965 च्या युद्धाची आठवण
या प्रसंगी बोलताना अण्णा हजारे यांनी 1965 साली भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणीही सांगितल्या आहेत. ”त्यावेळी मी काश्मीरमध्ये होतो. आमच्या सैन्यतुकडीवर पाकिस्तानी लढवय्या विमानांनी हल्ला केला होता. त्यात अनेक जवान शहीद झाले होते आणि माझ्याही डोक्याला गंभीर जखम झाली होती,” असे त्यांनी म्हटले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी अनेक जवानांनी बलिदान दिले आहे. आजही देशविरोधी शक्तींविरोधात लढणारे आपले सैनिक सज्ज आहेत आणि त्यांच्यावर संपूर्ण देशवासियांचा विश्वास आहे, असेही अण्णा हजारे यांनी सांगितले.
सिंधू नदीचं पाणी थांबवणं योग्यच
दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत विचारले असता अण्णा हजारे म्हणाले की, नाक दाबलं की तोंड उघडतं, अशी एक जुनी म्हण आहे. त्यामुळे सिंधू नदीचं पाणी थांबवणं ही कृती योग्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
भारतीय लष्कराची ताकद वाढणार
दरम्यान, भारत-पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराला स्वीडनकडून एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी शस्त्र प्राप्त झाले असून, ते म्हणजे कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर. हे शस्त्र स्वीडनच्या ‘साब’ कंपनीने पुरवले असून, सर्जिकल स्ट्राइकसारख्या कारवायांमध्ये याचा वापर होतो, ही यंत्रणेची खास वैशिष्ट्ये आहेत. ‘कार्ल गुस्ताफ’ हे एक अँटी-आर्मर रॉकेट लाँचर असून, शत्रूचे बंकर, दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड्स आणि रणगाडे यांना लक्ष्य करत त्यांचा संपूर्ण विनाश करण्याची क्षमता या शस्त्रात आहे. रणांगणात शत्रूकडून तोफा, रणगाडे किंवा अन्य जड शस्त्रे उतरवली गेल्यास, त्यांचा मुकाबला करण्यासाठी हे रॉकेट लाँचर अतिशय प्रभावी ठरते. भारतीय लष्कराच्या शस्त्रसज्जतेत या नव्या समावेशामुळे लष्कराची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
