आजरा/महान कार्य वृत्तसेवा
अभूतपूर्व उत्साही वातावरणात आजरा येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा झाला.
गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार शिवाजी पाटील, गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ, पद्मजा आपटे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष महादेव टोपले यांच्या प्रमुख उपस्थितीत व तमाम तालुकावासियांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा पार पडला.
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संदीप पारळे यांनी प्रेरणा मंत्र म्हणत कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्वागत व प्रास्ताविक विलास नाईक यांनी केले.
यावेळी पालकमंत्री आबिटकर म्हणाले, छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी आजरा तालुक्यातील जनतेचे स्वप्न होते, जे आज पूर्णत्वास गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या लोकार्पणाचे भाग्य मला लाभले..मला माझ्या आयुष्याचे सार्थक वाटत आहे.
गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, वैचारिक बैठकीचा तालुका असलेल्या आजऱ्यामधील सर्वपक्षीयांनी एकत्रित छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारला याचा विशेष आनंद होत आहे. यावेळी आमदार शिवाजी पाटील, नाविद मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती लोकार्पण सोहळ्यानिमित्त सकाळच्या सत्रात अभिषेक, होम-हवन असे धार्मिक कार्यक्रम, दुपारी ढोल ताशा सादरीकरण तर त्यानंतर शिवशाही पोवाडा मंचच्या शिवशाहीर दिलीप सावंत व सहकाऱ्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील विविध पोवाडे सादर केले.
यावेळी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, आजरा कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद देसाई, गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, माजी नगराध्यक्षा ज्योस्ना चराटी, सुनील शिंत्रे,विजय पाटील, सुधीर कुंभार, बाळ केसरकर, विजय थोरवत,मारुती मोरे, संजय सावंत, अंजुमन चे अध्यक्ष आलम नाईकवाडे व इतर मुस्लिम यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. अशोक बाचुळकर यांनी सूत्रसंचालन केले. आनंदा कुंभार यांनी आभार मानले.
अरुण डोंगळे यांच्याकडून मूर्तीला छत्र देण्याची घोषणा
लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी आजरा शहरात लोकार्पण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीला डोंगळे कुटुंबीयांच्या वतीने छत्र देण्याची घोषणा यावेळी केली. तसेच आमदार शिवाजी पाटील यांनीही दहा लाख रुपयांचा विकास निधी देण्याचे जाहीर केले.
