जयसिंगपूर/महान कार्य वृत्तसेवा
बंद घर पाहून चोरट्यानी घर फोडून सोने, चांदी, रोख रकमेसह सुमारे १५ लाख रुपयाचा मुद्देमाल येथील १४ व्या गल्लीतील मधुबन कॉलनीमधील नरेश चौगुले यांच्या घरातून लंपास केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. या चोरीच्या घटनेने जयसिंगपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसात या घटनेची झाली नव्हती.

याबाबत जयसिंगपूर पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, नरेश चौगुले कुटुंबीय १९ एप्रिलला चंदगड येथे पाहुण्यांच्या लग्नानिमित्त गेले होते. ते लग्नाचा कार्यक्रम संपून सोमवारी सायंकाळी जयसिंगपूर येथे आले. घराजवळ आल्यानंतर घराचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले. त्यानंतर घरातील असलेल्या कपाटामधील तोडफोड करून सर्व साहित्य विस्कटलेल्या अवस्थेत दिसून आले. यात चोरट्यानी अंदाजे तब्बल १० ते १२ तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या देवीच्या मूर्ती, रोख अडीच लाख रुपये असा एकूण अंदाजे १५ लाख रुपयाचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला.
त्यानंतर चौगुले यांनी पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर चौगुले कुटुंबीयांनी झालेला चोरीचा प्रकार आणि मुद्देमाल चोरीची गेल्याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी घटनास्थळी पाहणी केली.
त्यानंतर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक, ठसे तज्ञ व श्वानपथकाला करण्यात आले. घटनास्थळाच्या परिसरात श्वान घुटमळले. याबाबतचा अधिक माहिती रात्री उशिरापर्यंत पोलीस घेत होते. या चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
