आळते/महान कार्य वृत्तसेवा
येथील वारणा पाणी योजनेचे ८ लाख रूपये वीजबिल थकल्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडीत केला आहे. २ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने प्रामाणिकपणे पाणी बिल भरणारे अस्वथ्य आहेत. दरम्यान, ग्रामपंचायतीने दवंडी देवून वसुली सुरू केली आहे. परंतू, थकबाकीदारांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे. तसेच ग्रामपंचायतीकडे कार्यरत असलेल्या १५ कामगारांचेही पगार थकल्यामुळे त्यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक अडथळे पार करीत आळते गावासाठी वाठार, कुंभोज येथून वारणा नदीवरून पाणी योजना कार्यान्वित केली. तब्बल १४ कि.मी.अंतरावरून पाणी उपसा केला जातो. वर्षभरापासून स्वच्छ व मुबलक पाणी मिळत असल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले होते. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी थकीत पाणीपट्टी काही लाखांवर गेली होती. त्यामुळे वीजबिल न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत केला होता. ग्रामपंचायतीने थोडी तजवीज करून तात्पुरता पाणीपुरवठा सुरळीत केला होता. अशीच परिस्थिती मार्चच्या पहिल्याच दिवशी आली आहे. विद्युत पुरवठाच खंडीत केल्यामुळे २ दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प आहे. सुमारे थकबाकीचा आकडा ७० लाखांच्या घरात पोहोचला आहे. ऐन उन्हाळ्यात ही परिस्थिती उद्भवल्यामुळे पाणी देण्याची क्षमता असूनही थकबाकीमुळे योजना सुरू करता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पहावे लागेल यावर काय उपाययोजना केली जाते.
एकूण नळ कनेक्शन : २ हजार ८०० । थकीत पाणीपट्टी : ७० लाख । थकीत वीजबिल : ८ लाख । थकीत घरफाळा : ९० लाख। कामगारांचा थकीत पगार : ८ लाख
घरफाळा, पाणीपट्टी भरून सहकार्य करा: थकबाकीमुळे पाणी पुरवठ्यावर सातत्याने अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामपंचायतीकडून शुध्द व पुरेसे पाणी देण्याचा प्रयत्न आहे. परंतू, थकबाकीमुळे अडचणी येत आहेत. ग्रामस्थांनी घरफाळा, पाणीपट्टी भरून सहकार्य करावे. – अजिंक्य इंगवले, सरपंच, आळते