मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्रात बर्ड-फ्लूचा शिरकाव झाल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक भागात बर्ड फ्लूमुळं हजारो कोंबड्या मृत्यूमुखी पडत आहेत. कोंबड्यांबरोबर कावळ्यालादेखील बर्ड फ्लू झाल्याची माहिती समोर आली होती. तसंच, धाराशिव जिल्ह्यातील एका व्यक्तीला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळं राज्यात चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र या सगळ्याप्रकरणावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
कावळ्याला बर्ड फ्लू झाल्यानं आम्ही ही बाब गांभीर्यानं घेतलेली आहे. मात्र कोणत्याही व्यक्तीला ही लागण झालेली नाही, संबंधित व्यक्तीला बर्ड फ्लू झालाय अशी स्पष्टता नाही. मात्र खबरदारी म्हणून चिकन शॉप्स बंद केलेले आहेत, असं प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.
कॅन्सरचे रुग्ण वाढतायेत. आधी व्यसन असल्यास कॅन्सर व्हायचा मात्र अलीकडे लहानग्यांना ही कॅन्सरची लागण होत आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. भविष्याचा धोका पाहता, आम्ही कॅन्सरच्या मोफत लस देण्याचा आम्ही विचार करतोय, असंही आबिटकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ढोकी गावात माणसाला बर्ड फ्लू झाल्याची भिती व्यक्त करण्यात आली होती. लागण झालेल्या संशयित व्यक्ती हा मांस विक्रेता असल्याचे समोर आले होते. मागील काही दिवसांपासून हा व्यक्ती तापाने फणफणला होता. ताप कमी होत नसल्याने आरोग्य विभागाने त्याचा स्वॅब घेतला. स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट व्हायरॉलॉजी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे. राज्यात बर्ड फ्लूमुळे टेन्शन वाढले असून हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. अशातच वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापुरे येथील एका पोल्ट्री फार्ममधील 8 हजार कोंबड्यांपैकी 6 हजार 831 कोंबड्यांचा 20 ते 25 फेब्रुवारीदरम्यान मृत्यू झाला. अकोला येथील प्रयोगशाळेकडून येथील मृत पक्ष्यांचे नमुने संकलित करून ते तपासणीसाठी पुणे येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद-राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थानकडे पाठविले. तेथून हे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. या प्रयोगशाळेच्या तपासणीत कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे निष्पन्न झालय. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापुरे इथं बर्ड फ्लूमुळं तब्ब्ल 6 हजार 831 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. त्यामुळं जिलाधिकाऱ्यांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केलेय. या संदर्भात 27 फेब्रुवारी रोजी प्रयोग शाळेचा अहवाल आला असून 8000 पैकी 6331 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आलेय. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले असून प्रत्येक तालुक्यात तहसीलदाराच्या निग्रणीखाली समिती गठीत करण्यात आलीये.
