नागपूर/ महान कार्य वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अलि शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्या घरावर कोल्हापूर पोलिसांनी छापा घातला. मात्र, कोरटकर हा घरी मिळून आला नसून त्याने दोन दिवसांपूर्वीच नागपुरातून पलायन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नुकतेच छावा चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. ही भूमिका मांडत असताना त्यांनी बाह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करीत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने फोन करून थेट धमकी दिली, असा दावा सावंत यांनी केला आहे. याबाबत सावंत यांनी एक कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर शेअर केली आहे. ज्यामध्ये ”जिथं असाल तिथे येऊन बाह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असे म्हणत या कोरटकर यांनी सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असे या ध्वनिफीत मधून दिसून येते. या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वातील पथक बुधवारी मध्यरात्री नागपुरात पोहचले. या पथकाने बेलतरोडी पोलीस ठाण्यात आमद देऊन बेलतरोडी पोलिसांना मदत मागितली. आज गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने बेलतरोडी पोलिसांच्या मदतीने कोरटकरच्या घरी छापा घातला. मात्र, कोरटकर हा मिळून आला नाही. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचे पथक रिकाम्या हाताने पुन्हा बेलतरोडी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले आहे.
