खा. धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांचा पाठपुरावा
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयात आता नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. केवळ ३० दिवसात आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून इचलकरंजीकरांना गूड न्यूज दिली आहे. या निर्णयामुळे इचलकरंजीसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. या कॉलेजच्या मंजूरीसाठी खा. धैर्यशील माने आणि जिल्हा शिवसेनाप्रमुख रविंद्र माने यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या निर्णयाचे इचलकरंजीकरांनी स्वागत केले आहे.
आयजीएम रूग्णालय राज्यशासनाकडे हस्तांतरण झाल्यानंतर येथे अनेक अत्याधुनिक सुविधा सुरू करण्यात येत आहेत. इमारतीचे नुतनीकरण करण्यात आले असून याठिकाणी नर्सिंग कॉलेज करावे, जेणेकरून रूग्णांवर उपचार करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होईल, अशी सातत्याने मागणी जिल्हा शिवसेनाप्रमुख रविंद्र माने यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. तर महिन्याभरापूर्वी पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आयजीएमला भेट देवून पाहणी केली होती. यावेळी आयोजित बैठकीत रूग्णालय ३६० खाटांचे करण्यात आले आहे. इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ येथील बहुतांश रूग्ण उपचारासाठी आयजीएममध्ये येतात. परंतू, पुरेसा स्टाफ नसल्यामुळे रूग्णांवर उपचार करण्यास विलंब होतो. त्यामुळे येथे नर्सिंग कॉलेज सुरू केल्यास या माध्यमातून आवश्यक स्टाफ मिळेल याकडे रविंद्र माने यांनी लक्ष वेधत नर्सिंग कॉलेज सुरू करावे असा प्रस्ताव आरोग्य मंत्र्यांसमोर ठेवला. याचवेळी मंत्रीमंडळाच्या बैठकीत यास मान्यता घेवू असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होवून शासन निर्णयही काढण्यात आला आहे.
असा मिळणार प्रवेश :-
अभ्यासक्रमाचे नाव : जी.एन.एम.
प्रवेश पात्रता : १२ वी उत्तीर्ण
प्रवेश प्रक्रिया : राज्य सामाईक प्रवेश कक्ष (सीईटी)
विद्यार्थी प्रवेश क्षमता : प्रती वर्ष ४०
परीक्षा बोर्ड : महाराष्ट्र राज्य नर्सिंग ॲण्ड पॅरामेडिकल एक्सामिनेशन

प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान
इचलकरंजी शहराची गरज ओळखून येथे नर्सिंग कॉलेज सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खा. धैर्यशील माने यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान वाटते.
–रविंद्र माने जिल्हा शिवसेना प्रमुख