Spread the love

शहर प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवा 

 इचलकरंजी शहरातील नेहमीच वाहनांची वर्दळ असणारा राधाकृष्ण चौकामध्ये रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. रात्रीच्या वेळेस सदरचा खड्डा वाहनधारकांना सहजपणे निदर्शनास येत नसल्याने या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत त्यातच भर म्हणून ड्रेनेज चोकअप काढण्यासाठी याच ठिकाणी रस्ता उकरल्याने हे ठिकाण वानधारकांसाठी आणखीनच धोकादायक बनले आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सदरचा खड्डा बुजविण्याची मागणी नागरिक व वाहनधारकांतून होत आहे.

 इचलकरंजी शहरातील राधाकृष्ण चौक हा नेहमीच वाहनांच्या गर्दीने गजबजलेला असतो. मलाबादे चौकातून खंजिरी इंडस्ट्रियल इस्टेट, राजराजेश्वरी नगर, विक्रम नगर, वर्धमान चौक या परिसरामध्ये राहणारे नागरिक व कारखानदारांसाठी हा रस्ता सोयीचा असल्याने व रुंदीने मोठा असल्याने अनेक लोक या रस्त्याचा वापर करत असतात. त्यात चौकामध्ये चित्रपटगृह, अनेक रहिवासी कॉलनी, दोन शाळा, कापड व्यापाऱ्यांची कार्यालय मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे दिवसभर या रस्त्यावर वाहतुकीचा मोठा ताण असतो. राधाकृष्ण चौकामध्ये रस्त्याला मधोमध भगदाड पडून  मोठा खड्डा पडला आहे. सदरचा खड्डा हा जवळ आल्याशिवाय दिसत नाही. त्यामुळे वाहनधारकांना अचानक ब्रेक दाबावा लागतो.  तोपर्यंत वाहनधारकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून पडण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यात भर म्हणून पुन्हा ड्रेनेजचे  चोकअप काढण्यासाठी  रस्ता उकरल्याने तो चौक वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे तरी तातडीने महापालिका प्रशासनाने सदरचा खड्डा मुजवून घ्यावा अशी मागणी वाहनधारक व नागरिकांतून जोर धरू लागली आहे.