कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवा
मराठा आरक्षणाच्या लढाईत आता मनोज जरांगे पाटील यांना एकटे पाडले जाणार आहे. राज्यभरातील जवळपास 42 संघटनांनी आज कोल्हापुरात राज्यस्तरीय परिषद घेत एकत्रितरित्या ही लढाई पुढे घेऊन जाण्याचा निर्धार केलाय. तर जरांगे यांच्या मराठवाड्यात दुसरी मोठी परिषद घेण्याची घोषणा आज करण्यात आली असून जरांगे पाटील यांना हा शह मनाला जात आहे.
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आता नव्याने ठिणगी पडली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांची ताकद एकवटली त्यातून सरकारवर दबावही निर्माण झाला. मात्र त्यांच्या बदलणाऱ्या भूमिकांमुळे नेमके हाती काय लागले? हा सवाल मराठ्यांना पडत आहे. त्यामुळे ज्या संघटनांनी एकत्र येत मराठा क्रांती मोर्चा सारखे आंदोलन उभे करून मराठी मनात हुंकार आणि स्फूर्ती भरली.
कोल्हापुरात 42 संघटनांची राज्यव्यापी बैठक
त्या संघटना आता पुन्हा एकवटल्या आहेत. शिवसंग्राम, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, राष्ट्रीय मराठा महासंघ, मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा क्रांती ठोक मोर्चा अशा 42 संघटनांनी आज कोल्हापुरात राज्यव्यापी बैठक घेऊन पुन्हा एल्गार पुकारला आहे. त्यानुसार 10 मार्चपर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे आणि आमच्या मागण्या वेगळ्या
जरांगे पाटील यांना सोडून इतर संघटना एकवटल्याने मराठा समाजात फूट पडल्याची चर्चा आहे. मात्र जरांगे आणि आमच्या मागण्या वेगळ्या असून आम्ही त्या पूर्ण करण्यासाठी लढणार असल्याचे ज्योती मेटे यांनी स्पष्ट केलंय.
परभणीत मोठी महापरिषद घेण्यात येणार
आजच्या बैठकीत आरक्षण,सारथी,अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्यासह दहा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यासाठी परभणीत मोठी महापरिषद घेण्यात येणार असून मुख्यमंर्त्यांनी तिथे येऊन मराठा समाजाला काय देणार याचे उत्तर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
एकूणच पाहायला गेले तर जरांगे पाटील यांना बाजूला ठेऊन मराठा समाज आता आंदोलनात उतरताना दिसत आहे. त्यातून जरांगेंची समाजावरील पकड आता कमी होताना दिसत आहे. जरांगे यांना शह देण्यासाठी दुसरी परिषद परभणीमध्ये घेण्याचा निर्धार यात झाला आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाचे पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
