Spread the love

बुलढाणा/महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली होती. एकनाथ शिंदेंच शासकीय वाहन बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई आणि अकोला एटीएस तसेच मुंबई गुन्हे शाखा कक्ष 12 च्या पोलिस पथकाने कारवाई केली. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथून ई-मेल पाठविणाऱ्या अभय शिंगणे (25) आणि त्याचा नातलग मंगेश वायाळ या दोघांना अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. शुक्रवारी एटीएसच्या पथकाने दोघांना अटक करून मुंबईला नेले. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभय शिंगणेच्या दुकानात मंगेश वायाळ याने मोबाइल चार्जिंगला लावला होता. याच मोबाईलमध्ये असलेल्या मंगेशच्या ई-मेल आयडीवरुन धमकीचा मेल पाठवण्यात आला. विशेष म्हणजे मंगेशच्या ई-मेल आयडीवरुन पाठवण्यात आलेला हा पहिला ई-मेल आहे. आपण मेल पाठवलेला नाही, असे मंगशचे म्हणणे आहे.
अभयचे एका तरुणीवर प्रेम होते. या तरुणीचा मृत्यू झाला. या मृत्यूला अभय जबाबदार असल्याचा आरोप मंगेश करत होता. याच मुद्यावरुन मंगेशने अभयला शिवीगाळ आणि मारहाण केली होती. याचा बदला घेण्यासाठी अभयने मंगेशच्या ई-मेल आयडीवरुन धमकीचा मेल पाठवल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. आतेभाऊ-मामेभाऊ असे आरोपींचे नाते आहे. मंगेश वायाळ अल्पशिक्षित असून, अभयचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे; अशीही माहिती हाती आली आहे. पण या प्रकरणात सखोल चौकशी करुन मास्टरमाईंड शोधावा, अशी मागणी माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी केली आहे.