बुलढाणा/महान कार्य वृत्तसेवा
अंढेरा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पठ्ठ्यानं अफूची शेती फुलवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र या घटनेची माहिती मिळाल्यानं स्थानिक गुन्हे शाखेनं शुक्रवारी मध्यरात्री अंढेऱ्यातील या अफूच्या शेतीवर छापेमारी केली. पोलिसांनी या शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल 12.61 कोटी रुपयाच्या अफूच्या झाडांना जप्त केलं. त्यामुळे या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. संतोष सानप असं त्या अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांनी केलं शेतकऱ्याला अटक : याप्रकरणी पोलिसांनी संतोष सानप या शेतकऱ्याला अटक केली असून त्याच्यावर कलम 8 क, 18 क आणि एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अफूच्या शेतीवर छापेमारी टाकल्याची राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंढेरा पोलिसांच्या नाकावर टिच्चून अफूची शेती होत करण्यात येत होती. मात्र तरीही अंढेरा पोलिसांनी या अफूच्या शेतीवर कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्यानं नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे अंढेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
या अधिकाऱ्यांनी केली कारवाई : जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी बी महामुनी यांच्या नेतृत्वात आणि देऊळगाव राजाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचं (एलसीबी) पोलीस निरीक्षक अशोक लांडे, सहायक पोलीस निरीक्षक आशीष रोही, रूपेश शक्करगे, पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे, प्रताप बाजड आदींनी ही कारवाई यशस्वी केली. स्थानिक अंढेरा पोलिसांना कारवाईचा सुगावा न लागू देता स्थानिक गुन्हे शाखेनं ( एलसीबी ) ही कारवाई केल्याची चर्चा आहे.
व्वा रे पठ्ठ्या; शेतकऱ्याने पोलिसांच्या नाकावर टिच्चून फुलवली अफूची शेती: 12 कोटींची अफूची झाडे जप्त
