मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सूतोवाच केले होते. परंतु, आता या शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यातून 12 जिल्ह्यातील 12 मार्चला एल्गार करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 मार्चला शेतकरी आझाद मैदानात धडकणार आहेत. कोल्हापूरमध्ये शक्तिपीठ विरोधी परिषदेत आझाद मैदानात धडक देण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, महायुती सरकारने डिसेंबर महिन्यात शपथ घेतल्यानंतर गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी वेगवेगळे आराखडे तयार केले आहेत. या महामार्गाला फक्त कोल्हापुरातून विरोध असे सांगितले गेले. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांमध्येच शक्तिपीठ महामार्गावरून फाटे पडले आहेत. उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुर जिल्ह्यात बोलताना शक्तीपीठ महामार्ग नको असेल तर तो रद्द करण्याची मी घोषणा करतो, नको असणारा प्रकल्प तुमच्यावर लादणार नाही, असे विधान केले होते. आता त्यांच्याच पक्षाचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महामार्गाचे समर्थन केलं आहे.

शक्तिपीठ महामार्ग परिषदेसाठी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, शिवसेना संपर्क प्रमुख विजय देवणे, गिरीश फोंडे, शिवाजी मगदूम, सर्जेराव देसाई( संचालक शेतकरी संघ), आनंदा पाटील, विजयकुमार पाटील सोलापूर, गजेंद्र येळकर लातूर, शांतीभवन कछवे परभणी, संभाजी फरताडे धाराशिव, लालासाहेब शिंदे बीड, बापूराव ढेरे हिंगोली, सुभाष मारेलवर नांदेड, विक्रांत पाटील किणीकर, प्रकाश पाटील (गोकुळ संचालक), शशिकांत खोत (माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद ), आर एस कांबळे (संचालक बिद्री), उत्तम सावंत आदी उपस्थित होते
हसन मुश्रीफ यांनी सांगितला पर्यायी मार्ग
दुसरीकडे, वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग होणार नाही, असे म्हटले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्ग जाणार नाही. सांगलीपर्यंत कुणाचाही विरोध नाही त्यामुळे तिथे विरोध करायचा आमचा संबंध नाही. शक्तिपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा झाल्याचे हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. सांगलीच्या पुढे संकेश्वर मार्गे गोव्याला शक्तिपीठ महामार्ग होऊ शकतो. शक्तिपीठ महामार्ग सांगली ते कोल्हापूर रस्ता आहे, त्याला जोडला जाणार आहे. हायवेला जोडल्यानंतर पुढे संकेश्वर्मार्गे गोव्याकडे जाता येईल, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते.
दुसरीकडे, शहरी भागात असल्याने राजेश क्षीरसागर यांनी समर्थन केलं असलं, तरी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अजून स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. पहिल्यांदा विरोध केला असला, तरी आता पालकमंत्री म्हणून त्यांची भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीच्या नेत्यांमध्येच महामार्गावरून समन्वय नसल्याचे दिसून येते.