नवी दिल्ली/ महान कार्य वृत्तसेवा
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या कृषी अन् ग्रामीण विकास मंत्रालयाकडून चालवली जाते. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतर्कयांना पीएम किसानच्या 18 हप्त्यांचे 36000 रुपये मिळाले आहेत. आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या वितरणाचा कार्यक्रम बिहार राज्यात होणार आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचं हस्तांतरण बिहारच्या भागलपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात केलं जाणार आहे. हा कार्यक्रम 24 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. पीएम किसान सन्मान निधीद्वारे 9.7 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपये दिले जातात.
पीएम किसान योजनेद्वारे देशातील पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. सध्या देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 9 कोटी 70 लाख सदस्य आहेत. 19 व्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 21 हजार कोटी रुपये पाठवण्यात येणार आहेत.
पीएम किसानचे 2000 रुपये खात्यात येण्यासाठी काय करावं?
पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात विना अडथळा जमा व्हायचे असल्यास त्यांनी ई केवायसी करणं आवश्यक आहे. ई- केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचण होणार नाही. याशिवाय शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी नोंदणी करावी लागणार आहे. यानंतर शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. त्यासाठी जमीन पडताळणीदेखील आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे बँक खाते डीबीटी पर्याय सुरु असलेले आवश्यक आहे.
दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ऑक्टोबर 2024 मध्ये वर्ग करण्यात आला होता. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एका कार्यक्रमात देण्यात आला होता.
ई केवायसी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी आवश्यक करण्यात आली आहे. ई केवायसी फोनवरुन किंवा सीएससी केंद्रावरुन पूर्ण करता येईल.
