मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. बँकेचे माजी सरव्यवस्थापक हितेश मेहताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कथित घोटाळ्याबाबत हितेश मेहतांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारल असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला. हितेश मेहता यांच्यावर 122 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस हितेश मेहता यांची चौकशी करणार आहेत.
हितेश मेहता यांच्यावर 122 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप
हितेश मेहता यांच्यावर 122 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहेय याप्रकरणी दादर पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हितेश मेहता यांनी दादर आणि गोरेगाव येथील बँकेच्या शाखेतून गैरव्यवहार करत तब्बल 122 कोटी रुपये काढल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत हा गुन्हा पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
आरबीआय ने दोन दिवसांपूर्वीच या बॅकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध आणले होते. न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक वर आरबीआय बँकेने निर्बंध लादले आहेत. यामुळं या बँकांच्या बाहेर ठेवीदारांची मोठी गर्दी आहे. मात्र ह्या बँकेत नेमके काय झाले? ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळू शकतात का? किती मिळू शकतात? या स्थितीला जबाबदार कोण? या बाबत बँक तज्ञ विश्वास उटगी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याला आरबीआय दोषी आहे, तसेच बँकेतील अधिकारी देखील याला जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपण या सर्व ठेवीदारांना एकत्रित करणार असून त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे उटगी म्हणाले.
बँकेवर कडक निर्बंध
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतेच न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर कडक निर्बंध लादले आहेत. या बंदीनंतर आता बँक कोणालाही नवीन कर्ज देऊ शकणार नाही आणि सध्याच्या कर्जाचे नूतनीकरणही करू शकणार नाही. तसेच, बँक नवीन ठेवी स्वीकारू शकणार नाही आणि कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही. याशिवाय, तो त्याच्या दायित्वांची भरपाई करू शकणार नाही आणि त्याची मालमत्ता विकण्यास देखील मनाई केली जाईल.
