पुलाची शिरोली/महान कार्य वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात गांजा विकणाऱ्या व सेवन करणाऱ्या वर कारवाईची मोहीम पोलीस दलाने हाती घेतली आहे. आज शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील पुलाची शिरोली येथील माळवाडी भाग,नागाव परिसरात गांजा विक्री व सेवन करणाऱ्या तीन जणावर कारवाई केली आहे.
अधिक माहिती अशी की,सहायक पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. यावेळी पोलीस गस्त घालत असताना जियाउद्दीन ताजुद्दीन मुल्ला, (रा.सनदे गल्ली पुलाची शिरोली), प्रेमकुमार जोखनलाल (रा.संभाजीनगर,नागाव), कुलदीप उजागिर राम (रा.माळवाडी नागाव) हे तिघे गांजा सेवन करत असताना मिळून आले. या तिघांवर कारवाई करून पुलाची शिरोली व नागाव भागातून त्यांची धिंड काढण्यात आली.शिरोली एमआयडीसी परिसरात परप्रांतीय मजुरांची संख्या मोठी असल्याने या गांजा चे कनेक्शन उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान असण्याची दाट शक्यता आहे. त्याअनुषंगाने सदरचा गांजा कोठून आणला याची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले.तसेच अवैधरित्या कोण जर अंमली पदार्थांचा साठा करत असेल,विक्री व सेवन करत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवावे असे आव्हाहन शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी केले आहे.