महाराष्ट्र केसरीतील वाद संपवण्यासाठी चंद्रहार पाटलांचा पुढाकार
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वादावर पडदा टाकण्यासाठी सांगलीत पै. पृथ्वीराज मोहोळ आणि पै. शिवराज राक्षे यांच्यात विशेष कुस्ती सामना होणार आहे. पंचांच्या चुकीच्या निकालामुळे निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. हा सामना सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर घेण्याचा विचार आहे.त्यामुळे आता दोन्ही पैलवानांच्या निर्णयाकडे लक्ष असून दोन्ही मल्लांनी होकार दिला तर लवकरच या कुस्तीची तारीख जाहीर करण्यात येईल.
सांगलीत घेण्यात येणाऱ्या या कुस्तीसाठी दोन्ही पैलवानांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी या दोन्ही मल्लांची सांगलीत कुस्ती लावण्याची तयारी केली आहे. या दोघांना पै. पाटील यांनी प्रत्येकी 25 लाख रूपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला असून त्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र केसरीच्या सुरू असलेल्या वादावर सांगली येथे पडदा पडणार आहे. या सामन्यामुळे कुस्तीप्रेमींमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर होईल आणि महाराष्ट्राला एक दर्जेदार कुस्ती पाहायला मिळेल. महाराष्ट्र केसरीचा विजेता मल्ल पृथ्वीराज मोहोळ व उपविजेता मल्ल शिवराज राक्षे या या दोघांत पुन्हा कुस्ती लावून महाराष्ट्र केसरीचा सुरू असलेला वाद सांगलीत मिटविणार असल्याची चंद्रहार पाटील यांची भूमिका आहे.
महाराष्ट्र केसरीची स्पर्धा नुकतीच पार पडली. परंतु, ही स्पर्धा पंचाने चुकीचा निर्णय देत पै. मोहोळ याला विजयी घोषित केल्याचा आरोप अनेकांनी केला. त्यावेळी संतप्त झालेल्या पै. राक्षे याने पंचाला लाथ मारली. या प्रकारानंतर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी राक्षेच्या कृतीचे समर्थन करीत पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असे विधान करीत महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा मी परत करणार असल्याचे पै. पाटील यांनी जाहीर केले. त्यामुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडालीच शिवाय सोशल मिडीयावर महाराष्ट्र केसरी मल्ल पृथ्वीराज मोहोळ याने पै. शिवराज राक्षे याच्यासोबत पुन्हा एकदा कुस्तीची लढत द्यावी, अशी मागणी होऊ लागली. या सर्व प्रकारानंतर पै. मोहोळ व पै. राक्षे या दोघांनीही महाराष्ट्र केसरीसाठी पुन्हा लढण्यास तयार असल्याचे सांगितले.