Spread the love

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 143 वर्षांतून एकदाच येणाऱ्या या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत कोट्यवधी भारतीयांनी पवित्र स्नान केले. आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिवेणी संगमात अमृतस्नान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी महाकुंभ मेळ्याला उपस्थित राहण्यासाठी प्रयागराज येथे दाखल झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम असलेल्या त्रिवेणी संगमापर्यंत बोटीने प्रवास केला. नदीत गुडघ्यापर्यंत उभे राहून प्रार्थना करताना त्यांनी ‘रुद्राक्षांच्या माळा धरून मंत्रांचा जप केला. त्यानंतर त्यांनी त्रिवेणी संगमात पवित्र अमृतस्नान केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना पंतप्रधान बुधवारी प्रयागराज येथे आले. पौष पौर्णिमेला (13 जानेवारी) सुरू झालेला महाकुंभ 2025 हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक कार्यक्रम आहे आणि जगभरातील भाविक येथे येतात. हा महाकुंभमेळा 26 फेब्रुवारी रोजी संपेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आकर्षक पेहराव
भगव्या रंगाचा स्वेटशर्ट आणि ट्रॅकसूट परिधान केलेल्या पंतप्रधान मोदींनी त्रिवेणी संगमात रुद्राक्षाची माळे धरून संस्कृत मंत्रांचा जप करत प्रार्थना केली. त्याआधी नेव्ही ब्लू कुर्ता, काळा जॅकेट आणि हिमाचली लोकरीची टोपी घालून आरती केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धार्मिक स्नान केल्यानंतर, पंतप्रधान मोदी अनेक आखाड्यांमधील संतांच्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आणि राष्ट्रनिर्माणाबद्दल रवाना झाले आहेत.