Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या दीड महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. हत्या प्रकरणात संशयित असलेल्या वाल्मिक कराडवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर वाल्मिक कराडने मोठ्या प्रमाणात ‘माया’ जमवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाल्मिक कराडची ईडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. त्यातच वाल्मिक कराडविरोधात ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, वाल्मिक कराडविरोधात ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे.
आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी वाल्मिक कराडची ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल केली होती. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत सुरू करण्याचीही याचिकेत मागणी करण्यात आली होती. एका कॅबिनेट मंर्त्याचं नाव सातत्यानं येत असल्यानं पोलिसांच्या तपासात अनेक मर्यादा येत असल्याचा आरोप देखील याचिकेतून करण्यात आला होता. याप्रकरणी मंत्री महोदयांशी संबंधित अनेक कंपन्या आणि मालमत्तासमोर येत असल्यानं याचिकेत निवडणूक आयोगही प्रतिवादी करण्यात आला होता.
याचिकाकर्त्यांना 20 हजारांचा दंड
आता वाल्मिक कराडविरोधात ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांना स्वैर याचिका दाखल केल्याबद्दल 20 हजारांचा दंड ठोठावण्याचे हायकोर्टाने स्पष्ट करताच याचिका माघारी घेण्याचे याचिकाकर्त्यांनी मान्य केले आहे. याचिकाकर्त्यांचा हेतू याचिकेतून स्पष्ट होत नसल्यानं याचिका सुनावणीस योग्य नसल्याचे मत नोंदवत मुख्य न्यायमूर्तींनी या याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे.
वाल्मिक कराडचा कोठडीतील मुक्काम वाढला
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तब्बल 24 दिवस वाल्मिक कराड फरार होता. पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी अनेक पथके कामाला लावली होती. मात्र, तो पोलिसांच्या हाताला लागला नाही. वाल्मिक कराड 31 डिसेंबरला पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला होता. यानंतर वाल्मिक कराडचा पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी असा प्रवास सुरु झाला. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. कराडला 22 जानेवारी रोजी बीड विशेष न्यायालयाकडून 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. बुधवारी (दि. 04) त्याला कोर्टात हजर न करताच त्याच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.