राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणानंतर जितेंद्र आव्हाडांचा मोठा आरोप
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निष्पक्षतेवर राज्यातील विरोधी पक्ष सातत्याने शंका उपस्थित करत आरोप करत आहेत. अशात आता संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या या मुद्द्याला आता राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंबा दिला असून, ”महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत स्कॅम झाला आहे”, असे म्हटले आहे.
महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान ‘स्कॅम’
महाराष्ट्र निवडणुकीबाबत लोकसभेत विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या भाषणावर बोलताना राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, ”महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान एक ‘स्कॅम’ झाला आहे आणि सर्वांना याबाबत माहिती आहे. राहुल गांधी यांनी हा मुद्दा संसदेसमोर मांडून खूप चांगली गोष्ट केली आहे. देशालाही याबाबत कळू द्या.”
काय म्हणाले होते राहुल गांधी?
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर सोमवारी लोकसभेत झालेल्या चर्चेवेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील निवडणूक प्रक्रियांबाबत शंका व्यक्त केली होती. ते म्हणाले, ”लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही (इंडिया आघाडी) जिंकलो होते. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत 70 लाख नव्या मतदारांची नावे मतदार याद्यांमध्ये नोंदणी करण्यात आली. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने मतदार कसे समाविष्ट केले जाऊ शकतात? हा सर्व प्रकारच गोलमाल आहे.” यावेळी राहुल गांधी यांनी, भाजपाने जिंकलेल्या मतदारसंघांमध्ये मोठ्या संख्येने मतदार वाढल्याचा गंभीर आरोपही केला होता.
बिहारच्या खासदाराचाही राहुल गांधींना पाठिंबा
राहुल गांधी यांनी काल लोकसभेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत मांडलेल्या मुद्द्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभा खासदार मनोज झा यांनीही पाठिंबा दिला आहे. ते आज माध्यमांशी बोलताना म्हणाले, ”काल राहुल गांधी यांनी महाराष्ट्राबद्दल काहीतरी सांगितले, जे चिंताजनक आहे. म्हणून मी म्हणतो की, ही चिंता तेव्हाच दूर होईल जेव्हा निवडणूक आयोग कलम 324 अंतर्गत कोणत्या पक्षासाठी नाही तर, मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी काम करेल.”
महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा : फडणवीस
राहुल गांधी यांनी काल लोकसभेत केलेल्या आरोपांनंतर, भाजपाकडून त्यांच्यावर महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर एक पोस्ट करत म्हटले की, ”महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा! तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, वीर सावरकर यांच्या भूमीचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला आहे. तुमच्या पक्षाचा पराभव झाल्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील जनतेने एनडीएला लोकशाहीच्या मार्गाने दिलेल्या जनादेशावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे”.