मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
ईशान्य मान्सून परतीच्या वाटेवर असल्याने राज्यातील काही शहरांमध्ये ढगाळ हवामान असल्याचे पाहायला मिळतंय. राज्यातील काही शहरांमधील किमान तापमानामध्ये 30 जानेवारी रोजी घट होण्याची शक्यता आहे. कमी तापमान होऊन काही प्रमाणात थंडी जाणवायला सुरुवात होईल. 30 जानेवारी रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल पाहुयात.
मुंबई शहर आणि उपनगरात दाट धुक राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे. तर पुणे शहरांमध्ये धुक्यासह ढगाळ आकाश राहणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढे राहील. पुण्यातील किमान तापमानामध्ये घट होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 30 जानेवारी रोजी दाट धुक पडण्याची शक्यता असून कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढे राहील. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये दाट धुकं पडणार असून त्यानंतर आकाश ढगाळ राहणार आहे. नाशिकमधील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये अंशत: ढगाळ आकाश राहणार आहे तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. राज्यातील वातावरणात होत असलेले सातत्याने बदल यामुळे थंडी कमी अधिक प्रमाणात जाणवत आहे.