Spread the love

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
वेळ रात्री साडेबाराची… रस्त्यावर चिटपाखरुही नव्हते. याचवेळी इचलकरंजी-अतिग्रे उड्डाणपूलावर अचानक ब्रेक लागल्यामुळे चारचाकी गाडी तीन ते चारवेळा पलटी होऊन डिव्हायडरला धडकली. आसपास कुणीही नव्हते. गाडीतून धूर निघू लागला. आतील दोघे काच बंद असल्यामुळे गुदमरु लागले. याच दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने हे त्यांचे सहकारी राष्ट्रवादी शहराध्यक्ष अमित गाताडे, आरोग्य दूत विजय पाटील, सा.बां.विभागातील कर्मचारी अमीन रमदान, याकुब मुजावर यांच्यासमवेत कोल्हापूरहून इचलकरंजीकडे येत होते. त्यांच्या समोरच ही घटना घडली. त्यांनी समयसुचकता दाखवत अपघातातील गाडीतून धुर येत असतानाही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गाडीची दर्शनी काच फोडून गाडीत गुदमरलेल्या दोघा तरुणांना बाहेर काढले.

यावेळी त्यांनी रुग्णवाहिकेला बोलावून त्यांना सीपीआर येथे उपचारासाठी पाठविले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. यानंतर जवळून जात असलेल्या ट्रॅक्टरचालकाकडून रस्सी घेऊन रस्त्यावर मधोमध पडलेली गाडी बाजूला करुन वाहतूकीसाठी रस्ता खुला केला. त्यांच्या या समयसुचकता आणि तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला.