मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी त्यांचं उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा मारेकरी कोण हे आता समोर आलं आहे, मराठा समाजाचं डोळे उघडले असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाही केली. तसेच यापुढे शक्यतो आरक्षणाची लढाई बंद करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. उपोषणकर्त्यांशी चर्चा करून यासंबंधित पुढील निर्णय घेण्यात येईल असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले होते. गेल्या पाच दिवसांपासून हे उपोषण सुरू असून या दरम्यान जरांगे यांची तब्येत खालावली. तरीही शासन स्तरावरून या उपोषणाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं दिसून आले. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एवढे दिवस आंदोलन करावे लागेल असे वाटले नव्हते असे मनोज जरांगे म्हणाले.