Spread the love

अंजली दमानीयांचा अजित पवारांना थेट 96 तासांचा अल्टिमेटम

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस उलटले असून या प्रकरणात एक आरोपी अजूनही फरार आहे . धनंजय मुंडे यांचा राज्य सरकारने चार दिवसात राजीनामा घेतला नाही तर कोर्टात दाद मागणार असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना 96 तासांचा अल्टिमेटम दिलाय.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील दंडेलशाहीविरोधात आक्रमकपणे आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी दोन दिवसांपूर्वी (27 जानेवारी) उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती . वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे आर्थिक संबंधात गुंतलेले असल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे .धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या एकत्र कंपन्यांचे काही कागदपत्र अजित पवारांसमोर ठेवत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी ही त्यांनी केली होती . आता त्यांनी चार दिवसात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही तर थेट कोर्टात धाव घेणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना अल्टिमेटम दिलाय .
काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक संबंध असून त्या संदर्भातील सर्व पुरावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून दिल्याचे सांगत सर्व पुराव्यांची पडताळणी करून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 4 दिवसात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा लोकायुक्त आणि कोर्टात मी जाणार आहे असं अंजली दमानिया म्हणाल्या . सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी 50 दिवस उलटून गेले आहेत एक आरोपी अजूनही फरार आहे .सरपंच संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट करणाऱ्या सिव्हिल सर्जन डॉक्टरवर राज्य सरकारकडून 24 भष्टाचारांचे आरोप असताना नाशिक मधून त्याला बीडमध्ये कसा काय सिविल सर्जन म्हणून आणला गेला असा सवाल ही त्यांनी केला .
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का, अजित पवारांनी रोखठोक सांगितलं!
या प्रकरणातील तथ्य आणि पुराव्यानिशी अजून कुणाचं नाव आल्यास त्यावरही कठोरात कठोर कारवाई केली जाईल. मात्र कुणाचा काही संबंधच नसताना कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. किंबहुना कुणाचा संबंध असल्यास त्याला अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. हिच भूमिका माझ्यासह राज्याच्या मुख्यमंर्त्यांची असल्याची प्रतिक्रिया देत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.