मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि तो बरा झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. मात्र, पोलिसांनी अटक केलेली व्यक्ती चुकीची व्यक्ती असल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर पोलिसांनी आता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात एका बांगलादेशी महिलेला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत यापूर्वी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकानं वापरलेलं सिम कार्ड एका महिलेच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे.सैफ अली खान प्रकरण्यातील धागे-दोरे शोधण्यासाठी टीम रविवारी बंगालला पोहोचली. तिथून चापडा जिल्ह्यातून त्यांनी एका महिलेला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेचं नाव खुखुमोनी जहांगीर शेर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासोबतच ही महिला बांगलादेशी आरोपी शरीफुलच्या परिचयाची असल्याचं सांगितलं जात आहे.
पोलिसांनी अटक केलेला आरोपी शरीफुल बांगलादेशाच्या सीमेवरुन भारतात अवैधरित्या घुसला होता. त्यावेळी याच महिलेशी त्यानं संपर्क साधला होता. महिला बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या अंदुलियात राहणारी आहे. पोलिसांनी सोमवारी महिलेला अटक केली असून मुंबई रिमांडवर घेऊन गेली आहे. दरम्यान, यासंदर्भात पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. अशातच आता या प्रकरणाशी महिलेचा नेमका संबंध काय? हे महत्त्वाचं ठरणार आहे.