पुणे/महान कार्य वृत्तसेवा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाच्या संपन्न झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीवर शिवसैनिकांनी तीव नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढताना शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नाकीनऊ आले. संसदेत सुप्रिया सुळे भेटल्यावर त्यांच्याशी चर्चा करतो, असे म्हणत त्यांनी पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पुण्यात निवडणूक आढावा घेण्यासाठी विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीला शिवसेना नेते संजय राऊत, संपर्कप्रमुख सचिन अहिर, उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसैनिकांचा सुप्रिया सुळे यांच्यावर रोष का?
पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठकीला हजेरी लावली होती. यावेळी जवळपास चार तालुक्यातील (दौंड-बारामती-इंदापूर-पुरंदर) पदाधिकाऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला. लोकसभा निवडणूक काळात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते अजित पवार यांच्याविरोधात काम करायला घाबरत होते, त्यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या हिमतीने महाविकास आघाडीचा धर्म पाळून सुप्रिया सुळे यांच्यासाठी नेटाने काम केले. मात्र निवडणूक जिंकल्यावर सुप्रिया सुळे शिवसैनिकांना अजिबातच भेटत नाहीत. त्या फोनही उचलत नाही, त्यांचे स्वीय सहायकही आम्हाला प्रतिसाद देत नाही. आघाडीतील मित्रपक्ष म्हणून संपर्क ठेवणे हे त्यांचे काम आहे. फोनच घेत नाहीत, निधी द्यायची गोष्ट तर फार लांबचीष्ठ अशा शब्दात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात संताप व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांना कसे शांत केले?
सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीवर शिवसैनिकांनी आक्षेप नोंदवल्यानंतर आणि तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर संजय राऊत यांनी शिवसैनिकांची समजूत काढली. तुम्ही सांगताय असे प्रकार होत असतील तर हे गंभीर आहे. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्या स्वभावात बदल झाला असेल तर आपल्या कामाची आठवण त्यांना करून देऊ. दिल्लीत त्या ज्यावेळी कधी भेटतील, त्यावेळी मी त्यांच्याशी यावर नक्की चर्चा करेन, अशा शब्दात शिवसेना पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा राऊत यांनी प्रयत्न केला.
पक्षासाठी कुठे अनुकूल वातावरण? संजय राऊतांनी माहिती घेतली
शिवसेनेची कुठे ताकद आहे? कुठे स्वबळावर लढले पाहिजे? पक्षासाठी कुठे अनुकूल वातावरण आहे? यासंबंधीची माहिती संजय राऊत यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच विधानसभेला झालेला पराभव विसरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नव्या जोमाने कामाला लागा, अशा सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.