Spread the love

पंकजा मुंडेंनी दाखवली अंतरवाली सराटीत येण्याची तयारी

जालना/महान कार्य वृत्तसेवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांना आरक्षण देणार आहेत की नाही, हे सगळ्यांना कळणे गरजेचे आहे. आमचा सरकारसोबत कोणताही संपर्क झालेला नाही, किंबहुना आम्हाला त्याची गरज नाही. आपला शत्रू कोण आहे? गरीब मराठ्यांच्या पोरांचा मारेकरी कोण आहे, हे कळणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणासाठी सामूहिक उपोषण करणाऱ्या लेकरांचा जीव जाऊ न देणं ही मुख्यंर्त्यांची जबाबदारी आहे. फक्त मराठ्यांना हाल हाल करुन मारणं ही मुख्यमंर्त्यांची जबाबदारी नाही, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले. ते सोमवारी अंतरवाली सराटीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी सामूहिक उपोषणाला बसलेल्या तरुणांना उपोषण सोडायला सांगणार आहे. मराठा तरुणांची शरीर उपोषणामुळे खराब व्हायला नको. माझ्या शरीराचं वाटोळं झालेलं आहे, पण तरुणांचं शरीर खराब होता कामा नये. त्यामुळे आज मी सामूहिक उपोषणाला बसलेल्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणार आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. मराठ्यांच्या ठरलेल्या मागण्या आहेत, त्या द्या एवढंच मला म्हणायचं आहे बाकी काही नाही, असेही मनोज जरांगे यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांनी परवानगी दिली तर मी अंतरवाली सराटीला येऊन मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करेन, अशा आशयाचे वक्तव्य राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते. याविषयी मनोज जरांगे यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, आम्ही काय दहशतवादी आहोत का? आमची कोणाला ना नाही, अंतरवाली सराटीत कोणीही येऊ शकते आणि जाऊ शकते. आम्ही खुनशी नाही, जातीयवादी नाही. आम्ही कोणावरही डुख धरत नाही. इथे कोणीही येऊ शकतो कोणीही जाऊ शकतो इथं कोणाला ना नसते सगळा देश येऊन गेला आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
समाजाच्या लोकांचे कल्याण व्हावं हेच आमचे म्हणणे आहे. मध्यस्थ अशोकराव चव्हाण यांनी करावी किंवा आणि कोणी करावी याबाबत आमची ना नाही, आमच्या लेकरांचे कल्याण व्हावं आमच्या लेकरांना न्याय मिळावा एवढाच आमचा उद्देश आहे, अशोकराव चव्हाण असो किंवा कोणीही असो आम्हाला न्याय पाहिजे, असे यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटले.