पवारांचा आग्रह, काँग्रेसचा विरोध, ठाकरेंची भूमिका काय?
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या, मोठ्या संख्येने महायुतीने राज्यात पुन्हा सरकार स्थापन झाले. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यात सरकार स्थापन होऊन अनेक दिवस उलटले असले तरी देखील राज्याच्या विरोधी पक्षनेत्याची खुर्ची रिकामीच दिसून येत आहे. अशातच विरोधी पक्षनेतेपदाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात विरोधी पक्ष नेतेपदाचा वेगळा प्रयोग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विरोधी पक्ष नेतेपदी कोणाची वर्णी लागणार यापेक्षा जास्त ते पद महाविकास आघाडीमध्ये कोणाकडे जाणार याबाबतच्या चर्चा रंगल्या होत्या, असं असतानाच आता महाविकास आघाडीतील तीन पक्षांसाठी दिड-दिड वर्ष विरोधी पक्ष नेत्याचा फॉर्म्युला ठरवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिड वर्ष विरोधी पक्ष नेता फॉर्म्युल्याकरता शरद पवार आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राज्यात विरोधी पक्ष नेतेपदाचा वेगळा प्रयोग?
महायुतीतील तीन पक्षांसाठी दिड-दिड वर्ष विरोधी पक्ष नेत्याचा फॉर्म्युला असल्याच्या चर्चा आहेत. दिड वर्ष विरोधी पक्ष नेता फॉर्म्युल्याकरता शरद पवार आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस मात्र संख्याबळानुसार विधानपरिषदेत काँग्रेसचा आणि विधानसभेत ठाकरेंचा विरोधी पक्ष नेता असावा याकरता आग्रही, असल्याची माहिती आहे. दिल्लीत येत्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दरम्यान तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते दिल्लीत भेटणार आहेत. दिल्लीतून विरोधी पक्ष नेते पदाचा निर्णय येत्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दरम्यान होणार असल्याची चर्चा आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी नियम काय?
विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाकडे सभागृहाच्या सदस्यसंख्येच्या 10 टक्के आमदार असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात विधानसभा सदस्यांची एकूण संख्या 288 आहे. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे किमान 29 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे. विरोधी बाकावरच्या महाविकास आघाडीतील पक्षांपैकी ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20 काँग्रेसकडे 15, तर पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत, आता हे अपुरं संख्याबळ पाहता. नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद कोणत्याही एका पक्षाला मिळणार नाही, अशी चर्चा होती.
महाविकास आघाडीतील पक्षांकडे किती जागा?
महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये 50 जागांचा आकडाही पार करता आला नाही. काँग्रेस 16, उद्धव ठाकरेंना 20 तर, शरद पवारांच्या पक्षाला 10 जागांवर विजय मिळाला आहे.तर दुसरीकडे राज्यात भाजपने 2024 मध्ये सर्वात जास्त जागा मिळवल्या आहेत. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला आहे. त्याचबरोबर, शिंदेसेनेला 57 जागा आणि अजित पवारांच्या पक्षाला 41 जागांवर विजय मिळवला आहे.