Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
राज्यात रायगड पाठोपाठ आता लातूर जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या धोक्याच्या पार्श्‌‍वभूमीवर एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्याच्या धालेगाव गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये 4200 पिल्ले मृत्युमुखी पडल्याची माहिती पुढे आलीय. प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. यापूर्वी उदगीर शहरात बर्ड फ्लूमुळे सुमारे 60 कावळ्यांचा मृत्यू झाला होता.
लातूर जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या वाढत्या धोक्यात एक गंभीर आणि चिंताजनक प्रकरण समोर आले आहे. येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये 4200 पिल्लांचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. ही पिल्ले 5 ते 6 दिवसांची होती आणि 2 ते 3 दिवसांतच मरून गेली. यासंदर्भात पशुसंवर्धन आयुक्त डॉ. श्रीधर शिंदे म्हणाले की, पोल्ट्री फार्म मालकाने या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना वेळेवर दिली नाही. प्रशासनाने मृत पिल्लांचे नमुने पुण्यातील राज्य पशु रोग निदान प्रयोगशाळेत पाठवले आहेत आणि तपास सुरू आहे.
यापूर्वी याच जिल्ह्यातील उदगीर शहरात बर्ड फ्लूमुळे 60 कावळ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाने दक्षता वाढवली आहे. अहमदपूर पशुवैद्यकीय रुग्णालयाचे उपायुक्त डॉ. शिवाजी क्षीरसागर यांनी पोल्ट्री फार्म मालकांना त्यांचे फार्म नोंदणीकृत करण्याचे आणि अशा घटनांबद्दल स्थानिक अधिकाऱ्यांना तात्काळ कळवण्याचे आवाहन केले आहे.
पशुसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी पाहणी केली आणि तपास सुरू केला आहे. जानेवारीच्या सुरुवातीला उदगीर शहरात सुमारे 60 कावळे मृत्युमुखी पडले होते. पुणे येथील प्रादेशिक रोग निदान प्रयोगशाळा आणि भोपाळ येथील आयसीएआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेसने या मृत्यूंचे कारण बर्ड फ्लू असल्याचे घोषित केले होते. यापार्श्वभूमीवर कोंबडीच्या पिल्लांच्या मृत्यूमुळे चिंतेत वाढ झाली आहे.