जितेंद्र आव्हाड कडाडले, ‘पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?’
बीड/ महान कार्य वृत्तसेवा
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याच्या अडचणी आणखी वाढण्याच्या शक्यता आहे. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचे एकत्रित 29 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज झाले समोर आले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
केज शहरातील विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड 29 नोव्हेंबरला आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले हे सुद्धा या फुटेजमध्ये पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित पीएसआय राजेश पाटील हेसुद्धा यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसोबत दिसत आहेत. त्यामुळे खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याचं बोललं जात आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
वाल्मिक कराडचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. वाल्मिक कराडच खरा गुन्हेगार आहे. पोलिसांसोबत हातमिळवणी करुन खंडणी वसुली या सीसीटीव्ही फुटेजद्वारे उघड झाली आहे. तसेच ती खंडणी नव्हती, तो इलेक्शन फंडसाठी मागितलेला पैसा होता, असा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
वाल्मिक कराड छोटा आका- जितेंद्र आव्हाड
वाल्मिक कराड छोटा आका आहे. धनंजय मुंडेंनी उघडपणे वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे, असे सांगितले होते. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या…अजून किती पुरावे द्यायचे?, धनंजय मुंडे यांनी उघडपणे वाल्मिक कराड निलंबित राजेश पाटीलला अजून अटक का नाही?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस कोणाता मुहुर्त शोधतायत? असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.