Spread the love

जळगाव/ महान कार्य वृत्तसेवा
प्रेम विवाहाच्या रागातून सासरच्यांनी 26 वर्षांच्या जावयाची हत्या केली आहे. मुकेश शिरसाट असे मृत्यू झालेल्या जावयाचे नाव आहे. जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या हुडको भागातील घटनेने खळबळ माजली आहे. जावयाची हत्या करणारे पत्नीचे चुलत भाऊ, मामा आणि सासरच्या 7 नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली आहे, तर 3 संशयीत अद्यापही फरार आहेत. या हल्ल्यात मुकेश याच्या गर्भवती पत्नीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण सुदैवाने ही महिला बचावली आहे.
प्रेम विवाहातून हत्या
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या हुडको भागात राहणाऱ्या मुकेश शिरसाट या तरुणाचे आपल्याच भागात राहणाऱ्या पूजासोबत प्रेम संबंध जुळले, यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण पूजाच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते. घरच्यांच्या विरोधात जाऊन पूजाने मुकेशसोबत 4 फेब्रुवारी 2022 रोजी लग्न केले.
मुकेश हातमजुरी करून आपला संसार चालवत होता. विरोध झुगारून लग्न केल्यामुळे पूजाच्या माहेरच्यांकडून वारंवार वाद निर्माण केले जात होते. अनेकदा हे वाद पोलिसांपर्यंतही पोहोचले, पण कौटुंबिक वाद असल्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका न घेता या प्रकरणात दोन्ही कुटुंबांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला.
प्रेम विवाहाचा राग पूजाच्या माहेरच्यांनी डोक्यात ठेवत अखेर मुकेशचा काटा काढला. यात पूजाच्या माहेरच्यांनी गर्भवती असलेल्या पूजावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुदैवाने हल्ल्यात पूजा बचावली, असा आरोप पूजाने केला आहे.
घटनेवेळी नेमके काय घडले?
मुकेश आणि त्याच्या सासरच्या नातेवाईकांचा 18 जानेवारीला संध्याकाळी वाद झाला, हा वाद मिटवण्यासाठी काहींनी प्रयत्न केला, मात्र रविवारी सकाळी 8.30 वाजता मुकेश कामासाठी घराबाहेर पडत असताना त्याच वेळी हातात लाठ्या काठ्या, धारदार शस्त्र घेऊन मुकेशच्या सासरचे काही लोक आणि त्यांचे सहकारी घरात घुसे आणि त्यांनी मुकेशवर हल्ला करायला सुरूवात केली.
नणंदेने वाचवला पूजाचा जीव
मुकेशला वाचवण्यासाठी काही जण पुढे आले मात्र त्यांच्यावरही जमावाने हल्ला केला. मुकेशची गर्भवती पत्नी पूजा हिच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, पण पूजाची नणंद वेळीच आल्याने गर्भवती असलेली पूजा या हल्ल्यात बचावली.
मुकेशची त्याच्याच घरासमोर सासरच्यांनी हत्या केल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. या घटनेत जखमी झालेल्या चार ते पाच जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मुकेश आणि पूजा यांना 3 वर्षांची मुलगी आहे, तसंच पूजा ही गर्भवतीही आहे. अशा परिस्थितीमध्ये मुकेशची हत्या झाल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हल्लेखोरांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मुकेशच्या बहिणीने केली आहे.