Spread the love

छत्रपती संभाजीनगर/ महान कार्य वृत्तसेवा
सरकारी नोकरी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास आणि मेहनत घ्यावी लागते तरच तुम्ही यश संपादन करू शकता. असंच यश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्रद्धा नरवाडे हिने संपादन केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्‌ि‍हस (आयईएस) 2024 या परीक्षेत श्रद्धा दिलीप नरवडे हिने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. या परीक्षेत श्रद्धाने देशपातळीवर 17 वा तर राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. आता श्रद्धाची केंद्रीय अर्थ मंत्रालयात निवड असिस्टंट डायरेक्टर या पदावर निवड झाली आहे.
श्रद्धा नरवडे ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चितेगाव या ठिकाणची मूळ रहिवासी आहे. श्रद्धाचे वडील शिक्षक आहेत तर तिची आई गृहिणी आहे. श्रद्धाचे सर्व शालेय शिक्षण हे छत्रपती संभाजीनगर शहरात पूर्ण झाले आहे. त्यानंतर तिने तिचे ग्रॅज्युएशन हे देवगिरी महाविद्यालयामधून पूर्ण केले आहे. पदव्युत्तर शिक्षण इकॉनॉमिक्समध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून केले आहे. श्रद्धाच्या वडिलांची परिस्थिती अतिशय हालाखीची होती. त्यामुळे त्यांनी अगदी कठीण परिस्थितीवर मात करत शिक्षण करून शिक्षक झाले.
श्रद्धाच्या वडिलांची इच्छा होती की श्रद्धाने स्पर्धा परीक्षा करून सरकारी नोकरी मिळवावी. त्यासाठी तिचे वडील तिला लहानपणापासून सर्व गोष्टी शिकवत होते आणि सांगत होते. श्रद्धाला देखील वाटले की आपण देखील आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. म्हणून तिने देखील ठरवले की आपण स्पर्धा परीक्षा करायला पाहिजेत आणि त्यामध्ये यश संपादन करायला पाहिजे. श्रद्धाने ठरवले की आपण आता यूपीएससी स्पर्धा परीक्षा द्यायची. तिने कॉलेजला असल्यापासूनच याची तयारी करायला सुरुवात केली.
श्रद्धा दिवसभरामध्ये आठ ते दहा तास अभ्यास करायची आणि तिने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. ते सुद्धा कुठल्याही प्रकारचे क्लासेस न करता तिने स्वत:च अभ्यास करून हे संपादन केले आहे. चार डिसेंबर रोजी तिचा इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यू झाल्यानंतर काही दिवसातच त्याचा निकाल आला आणि त्यानंतर तिचे सिलेक्शन झाले आहे. माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे याचा मला खूप अभिमान आहे, असे श्रद्धा म्हणाली.