Spread the love

शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचे बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च 2025 च्या दाहवी- बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्राबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर आता विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याचे समोर आले आहे. हॉल तिकीटवर केल्या गेलेल्या जात प्रवर्गाच्या उल्लेखानंतर शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षकांकडून बोर्डाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख
शाळेत विद्यार्थ्यांच्या जातीची नोंद नेमकी का झाली आहे हे पालकांना आणि विद्यार्थ्यांना कळावे, यासाठी हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा रकाना असल्याचा बोर्डाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मात्र एकीकडे शाळेच्या दाखल्यावर जातीची नोंद हटवण्याची मागणी होत असताना बोर्डाकडून जात प्रवर्ग हॉल तिकीट वर दिला जात असल्याचं समोर आले आहे. यंदाचे वर्षी दहावी, बारावी बोर्डाच्या हॉल तिकीटमध्ये काही बदल करण्यात आले आहेत आणि त्यामध्येच विद्यार्थी कोणत्या जातीच्या प्रवर्गात मोडतो हे स्पष्ट हॉल तिकीटवर असलेल्या रकान्यात दिसत आहे.
बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट वितरित करायला सुरुवात झाली असून दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट सोमवारपासून वितरित केले जाणार आहेत. कागदपत्रावर जातीची नोंद चुकली असेल तर पालकांना शिक्षणाधिकारी उपसंचालक कार्यालयातून योग्य ती कागदपत्रे सादर करून तो बदल करून घेता येईल, विद्यार्थ्यांची जातीची नोंद शाळेमध्ये योग्य झाली आहे हे कळण्यासाठी हॉल तिकीट वर जात प्रवर्ग दिला असल्याचा सांगितलं गेलंय. सामाजिक न्याय विभागाला विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देता यावा, यासाठी दरवेळी जात निहाय आकडेवारी विद्यार्थ्यांची द्यावी लागते. त्यासाठी हॉल तिकिटावर योग्य ती जात प्रवर्ग कळल्यास त्याचा उपयोग होईल, असं बोर्डाकडून सांगण्यात आलंय.
बोर्डाने घेतलेला निर्णय न पटणारा -हेरंब कुलकर्णी
दरम्यान, दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जातीचा उल्लेख करण्यात आल्याने बोर्डाच्या या निर्णयावर शिक्षण तज्ञ आणि शिक्षकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर बोर्डाने घेतलेला हा निर्णय चुकीचे असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची ओळख आपण परीक्षांमध्ये झाकत असतो. विद्यार्थ्यांची ओळख परीक्षकाला कळू नये यासाठी रोलनंबर वर सुद्धा आपण स्टिकर लावत असतो. अशातच या निर्णयावर बोर्ड दिलेले स्पष्टीकरण हे न पटण्यासारखं आहे. एक वेळ जातीचा उल्लेख हा निकालावर छापलं असतं तर चाललं असतं. किंबहुना दाखल्यावर जात असताना पुन्हा हॉल तिकीट वर जातीचा उल्लेख करणे हे ही न पटणारे असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे.
10वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च 2025 च्या दाहवीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीनं जारी करण्याची तारीख जाहीर कारण्यात आली आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट येत्या सोमवारपासून म्हणजेच 20 फेब्रुवारीला उपलब्ध होणार आहेत. सर्व माध्यमिक शाळांना फेब्रुवारी मार्च 2025च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळाववरुन लिंक द्वारे डाउनलोड करण्याकरिता उपलब्ध होणार आहे.