Spread the love

नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; ‘आठवड्याभरात…’

नाशिक/महान कार्य वृत्तसेवा
शहरातील पंचवटी परिसरातील काही भागात पाण्याची समस्या गंभीर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भगवान बाबा नगर, इंद्रप्रस्थ नगरी, उदयनगर परिसरात राहणाऱ्या महिलांची पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नाशिक शहर झपाट्याने वाढत असून शहरातल्या काही भागात पाणीपुरवठाच होत नाही. आठवड्याभरात पाण्याची समस्या मार्गी लागली नाही तर महापालिकेवर हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे.
नाशिक शहराच्या पंचवटी परिसरातील अनेक भागात नागरिकांची परिस्थिती ही धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली आहेत. खरंतर नाशिक शहर झपाट्याने वाढत आहे. मात्र तितक्याच प्रमाणात नवीन रहिवासी परिसरात नाशिककरांच्या मूलभूत गरजा देखील भागत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून नाशिकसह छत्रपती संभाजीनगर आणि इतर जिल्ह्यांची देखील तहान भागवली जाते. मात्र मुख्य शहरापासून अवघ्या काही अंतरावर पाण्याचा प्रश्न नाशिक महापालिका गेल्या अनेक दिवसांपासून सोडवू शकले नाही.
शहरातील महिलांची पाण्यासाठी वणवण
ग्रामीण भागासारखीच परिस्थिती नाशिक शहरात पाहायला मिळत आहे. नाशिक शहराच्या पंचवटी परिसरात असलेल्या भगवान बाबा नगर, इंद्रप्रस्थ नगर, आणि उदयनगर या परिसरात महिलांना तासंतास पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही परिसरात महापालिकेचे नळ पोहोचले आहे तर त्या नळाला पाणी नसल्याची परिस्थिती दिसून येत आहेत तर आठ दिवसांनी काही भागांमध्ये पाणीपुरवठा हा कमी दाबाने होत असल्याचा स्थानिक महिला सांगत आहे.
500 ते 700 कुटुंबाच्या घशाला कोरड
500 ते 700 कुटुंबाची पाण्याची तहान भागवण्यासाठी आजूबाजूला असलेल्या बोरवेलवर महिला अक्षरश: रांगा लावून आपली पाण्याची तहान भागवत आहे . कुटुंबांना बोरचे दूषित पाणी प्यायला लागत असल्याने त्वचेचे अनेक विकार होत आहेत. बोरच्या पाण्यामुळे लहान मुलांचे आजाराचे प्रमाण देखील वाढल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेला पाठपुरावा करूनही अधिकारी लक्ष देत नाही. दोन-तीन वर्षांपासून पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. काही भागात बोरवेलवर पाण्याची गरज भागवावी लागत आहे. महापालिकेकडून या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीच येत नाही पण पाण्याची पट्टी भरावी लागते. पाण्याची समस्या सोडवली नाही तर महापालिकेत जाऊन आंदोलन करू, असा इशारा महिलांनी दिला आहे.