मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
बॉलिवूड अभिनेत सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला. एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसत सैफ अली खानवर धारदार शस्त्राने वार केले. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे. मात्र सैफ अली खानवर हल्ला नेमका का करण्यात आला?, या हल्ल्यामागचं मुख्य कारण काय?, याबाबत मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे.
सैफ अली खानवर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर (आधीचे ट्विटर) पोस्ट करत केला आहे. गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव तैमुर ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे.
वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच- जितेंद्र आव्हाड
सैफ अली खानवर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे. त्यातील दोन वार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे समजते. एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता, वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सैफ अली खान हा भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जार्णाया पद्श्री पुरस्काराने सन्मानित आहे, हे विशेष…असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.
दीपक केसरकर काय म्हणाले?
सैफ अली खान हे व्हीआयपी कॅटेगिरीमध्ये आहेत त्यामुळे ही घटना कशी घडली हे बघावा लागेल. पोलीस कसून चौकशी करतील आणि मुख्यमंर्त्यांकडे गृहखातं आहे. त्यामुळे तेही बारकाईने लक्ष घालत आहेत. इतर शहरांपेक्षा मुंबईची सुरक्षाही चांगली आहे. अशा एक दोन घटना घडलेल्या आहेत ही गंभीर बाब आहे. मुंबईचं संरक्षण करणं ही फार कठीण जबाबदारी असते. मीही या विभागाचं काम पाहिलं आहे. या संदर्भात जर काही कमतरता असेल, तर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.