मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
भारतीय कर्णधार रोहित शर्मानंतर आता दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीने देखील अलिबागमध्ये अलिशान घर घेतले आहे. लवकरच ते दोघे अलिबागमधील नव्या व्हिलाची गृहपूजा करणार आहेत. त्यांचं भव्य घर तयार झालं असल्याची माहिती असून गृहप्रवेशाची तयारी सुरु आहे. त्याच्या नवीन घराचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरलं होत आहेत.
विराट अनुष्काचे नवीन घर गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय बनला आहे. अनुष्का आणि विराट हे गेल्या काही दिवसांत अलिबाग आणि मुंबई दरम्यान ये-जा करताना दिसत आहेत. या जोडप्याचं अलिबागमध्ये हॉलिडे होम आहे. त्यामध्ये शिफ्ट होण्याची तयारी आता सुरु झाली आहे. अनुष्का- विराट ही दोघेही त्यांच्या हॉलिडे होमच्या गृहप्रवेश पूजेची तयारी करत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक पूजेचा सामान आणि मिठाई घेऊन फेरीने अलिबागकडे जाताना दिसत आहेत. त्यामध्ये एक पुजारीही दिसत आहे. त्यानंतर आता विराट आणि अनुष्का अलिबागच्या घराची गृहपूजा लवकरच करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
2023 मध्ये, विराट कोहलीने अलिबागमधील आवस लिव्हिंगमध्ये 2,000 चौरस फुटांचा व्हिला तब्बल 6 कोटी रुपयांना खरेदी केला. भारताच्या माजी कर्णधाराने मुद्रांक शुल्कासाठी 36 लाख रुपये देखील दिले आहेत.त्यांच्या नवीन घरात एक आकर्षक 400 स्क्वेअर फुटाचा स्विमिंग पूल आहे. याशिवाय, इथे अनेक सुविधांसह एक खास वैयक्तिक सुसज्ज गॅरेज आणि बागेतील निरिक्षणासाठी विविध जागा तयार केल्या गेल्या आहेत. विराट आणि अनुष्काचे हे फार्महाऊस तब्बल 19.24 कोटी रुपयांचे आहे.
