Spread the love

तिरूपती/ महान कार्य वृत्तसेवा
तिरूपती देवस्थानमध्ये दरवर्षी वैकुंठ एकादशी महोत्सवाचं आयोजन केलं जातं. 8 जानेवारी रोजीच्या या महोत्सवासाठी देवस्थानकडून भाविकांना दर्शनासाठीचे टोकन वितरीत करण्यात येणार होते. यासाठी देवस्थानकडून स्वतंत्र काऊंटर्सची व्यवस्था करण्यात आली. बुधवारी सकाळपासूनच या काऊंटरवर टोकन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. संध्याकाळपर्यंत ही गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली. काही भाविकांमध्ये टोकन घेण्यासाठी धक्काबुक्की झाल्याचंही दिसून आलं. यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू आणि 30 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, एका व्यक्तीला त्याची पत्नी मृत झाल्याचं एका व्हायरल व्हिडिओमधून समजलं. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
व्यंकटेश हे मुळचे विशाखापट्टणमचे असून वैकुठं एकादशीनिमित्त ते तिरुपतीला पत्नी आणि मुलाबरोबर गेले होते. पण त्यांचा हा प्रवास शेवटचा ठरेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल. दर्शनाकरता टोकन घेण्याकरता हे कुटुंब विष्णू निवासजवळ रांगेत उभं राहिलं होतं. या रांगेत आधीच खूप गर्दी होती. परंतु, एका महिलेला अस्वच्छ वाटू लागल्याने तिला बाहेर काढण्याकरता एका अधिकाऱ्याने तेथील दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच तेथील भाविकांना वाटलं की टोकन देण्यासाठी दरवाजा उघडला आहे. त्यामुळे भाविकांनी आतमध्ये गर्दी केली. यातच चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला. यातच व्यंकटेश यांची पत्नी शांताचा समावेश होता.
पीडित पती काय म्हणाला?
याबाबत व्यंकटेश म्हणाले, ”पोलिसांचं व्यवस्थापन फार वाईट होते. माझी पत्नी रांगेत पुढे उभी होती. ती पडल्याचं आम्हाला कोणालाही कळलं नाही. चेंगराचेंगरीनंतर आम्ही तिचा हताशपणे खूप शोधथ घेतला. रुग्णालयात जाऊनही तिची चौकशी केली. पण आम्हाला तिच्याबद्दल काहीच कळालं नाही. परंतु, एका व्हायरल व्हिडिओमुळे तिचा मृत्यू झाल्याचं समजलं.”